“मुंबईत पाऊस कोसळतोय… काळजी घ्या, घरात सुरक्षित रहा!”
मुंबईत पाऊस आभाळ फाडून कोसळतोय… रस्ते, गल्ली, ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तुमच्यासाठी हे मनापासूनचं आवाहन आहे
👉 गरज नसेल तर कृपया बाहेर पडू नका.
👉 रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात लहान मुलं खेळताना दिसत आहेत – पण ते पाणी खेळण्यासाठी नाही. त्या पाण्यात कचरा, जंतू, विजेचा धोका आणि सर्वात मोठं म्हणजे उघडी मॅनहोल्स असतात. क्षणाचं खेळणं आयुष्यभराचं दु:ख देऊ शकतं. मुलांना आवरा, प्रेमाने सांगा – “पाण्यात खेळू नका, जीव धोक्यात आहे.”
👉 रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. अनेक प्रवासी पावसात ओलेचिंब होऊन ट्रॅकवरून चालताहेत. पण लक्षात ठेवा, ट्रॅकच्या अगदी शेजारी खोल गटार लाइन आहे. पाय घसरला तर जीवघेणा अपघात होऊ शकतो. प्रवाशांनो, काळजी घ्या, सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
👉 पावसाच्या पाण्यात विजेच्या तारा पडलेल्या असू शकतात, शॉर्टसर्किट होण्याचा धोका आहे. कुठेही तारा दिसले तर लगेच महापालिका किंवा वीज मंडळाला कळवा.
👉 रस्त्यांवर मोठमोठ्या झाडांच्या फांद्या कधीही कोसळू शकतात, त्यामुळे अशा ठिकाणी उभं राहू नका.
👉 शक्य असल्यास घरातच राहा. मोबाईल चार्ज ठेवा, आप्तेष्टांना सुरक्षिततेबाबत सांगा. मुंबईकरांनो, आपली शहराशी नाळ आहे, हीच मुंबई आपल्याला जगवते. आज तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे.
जीव वाचला तर सगळं परत उभं राहील.
सुरक्षित रहा, काळजी घ्या – जीवापेक्षा काहीही मोठं नाही!❗







