न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही एक नवा उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या बातमीची फारशी चर्चा केली जात नाही, त्याबद्दलची भूमिका मोजक्या शब्दांत आम्ही मांडू. आपणही यावर व्यक्त व्हा. आपल्या सूचनांचे स्वागत असेल.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आणि मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. एकीकडे मराठ्यांना आरक्षण हवे यासाठी गेली काही वर्षे हे आंदोलन सुरू आहे. त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. २९ ऑगस्टला आपण मुंबईत येऊन उपोषण करणार हे जाहीर केल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत आले आणि दक्षिण मुंबईचा परिसर भगव्या रंगात रंगून गेला. पण या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे मात्र अतोनात हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील आंदोलकांची प्रचंड गर्दी, त्यामुळे या गर्दीने भरलेल्या लोकल रेल्वे, फ्री वे वर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आंदोलकांमुळे झाले रहदारीची कोंडी, रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या गाड्या, रहदारीची झालेली वाताहत, त्यातच पाऊस आणि नेहमीच्या चाकरमान्यांना सहन करावा लागलेला त्रास असा सगळा गोंधळ या भागात होता.
आधीच मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे. त्या काळात हे आंदोलन होऊ नये अशी अपेक्षा होती, पण जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलकांनी आरक्षणासाठी मुंबईत येणारच असा हट्ट धरलेला असल्यामुळे मुंबईकरांना त्याचा फटका बसणार हे स्पष्ट होते. लोकल रेल्वेमध्ये सगळे आंदोलक मोठ्या संख्य़ेने प्रवास करत होते, त्यामुळे गर्दीला सुमार राहिला नाही. सीएसएमटी स्थानकाजवळ झालेली गर्दी ही चाकरमान्यांच्या त्रासात भर घालत होती. रस्ते गर्दीने फुलून गेल्यामुळे या चाकरमान्यांना ऑफिसपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही गाड्या मिळणे मुश्किल झाले. त्यामुळे चालत कार्यालय गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. कसारा, कर्जत, पालघर, विरार, आणि नवीमुंबईतून येणाऱ्या लोकल गाड्या आंदोलकांनी तुडुंब भरल्या होत्या.
या भागांतून मुंबईत कामासाठी येणारे कर्मचारी आणि व्यापारी यांना आंदोलनाचा मोठा फटका बसला. फ्री वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे लोकांची परवड झाली. सीएसएमटी स्थानकाजवळ काही आंदोलक हुल्लडबाजी करताना दिसले. कुणी पालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या जलकुंडामध्ये आंघोळ करून सरकारचा निषेध करत होते.
आरक्षणाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे हे खरे असले तरी लोकांच्या मनातला प्रश्नही सुटला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून आंदोलन कसे काय केले जाऊ शकते. आम्ही रस्ते बंद पाडू, रेल्वे स्थानकात गर्दी करू, रस्ते अडवू, या सगळ्यातून जनमानसात आंदोलनाबाबतची कोणती सहानुभूती राहणार आहे? याचा विचार केला जाणार आहे की नाही? किती काळ असे आंदोलन चालणार आहे. विशेष म्हणजे उत्सवाच्या काळात असे आंदोलन झाल्यामुळे लोकांच्या त्रासात भर पडते आहे, याचे भान आहे की नाही. लोकांची पिळवणूक करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला लावण्याचा हा प्रकार नाही का?
बरे, यावर देवेंद्र फडणवीस सरकारची कोणती भूमिका आहे. आंदोलकांना आणखी एक दिवस वाढवून देण्यात आला आहे. त्यामागे काय उद्देश आहे. म्हणजे उद्याचा एक दिवसही हाच त्रास लोकांनी सहन करायचा आहे का? आधीच गणेशोत्सवासाठी लोक रोज खरेदीच्या निमित्ताने गर्दी करत आहेत, त्यातच या गर्दीची भर पडली आहे. महायुती सरकारने याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक नाही का? किती दिवस हे चालणार आहे? आता गौरी गणपतींचे विसर्जन काही दिवसांत होणार आहे, तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे का, याचा ताण कुणी कुणी सहन करायचा आणि का? हा प्रश्न आहे. पोलीसांवर तर ताण आहेच, पण सर्वसामान्य जनतेला जे भोगावे लागत आहे, त्याचे काय? आरक्षण देऊन टाका आणि मुंबईकरांना या त्रासातून मुक्त करा, असे कुणीही म्हणत नाही, पण कुठेतरी सर्वसामान्य जनतेचा विचार होणार की नाही ?
हे ही वाचा:
महुआ मोईत्रांचे डोके फिरले; म्हणाल्या अमित शहांचे डोके छाटा!
हॉकी आशिया कप: भारताचा चीनवर ४–३ ने रोमांचक विजय!
जपानमध्ये पंतप्रधानांना भेट स्वरुपात मिळालेली ‘दारुमा बाहुली’ आहे तरी काय?
जैशचे दहशतवादी बिहारमध्ये घुसले?, नेपाळ म्हणाले- ते तर मलेशियाला गेले.
मनोज जरांगे यांचे हे आंदोलन निव्वळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आहे की त्यात राजकारणच आहे याविषयी लोक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. कारण लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्या राजकारणाचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे. आता जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कि बंदुका ठेवून कोण कुणाकुणाचा वेध घेते आहे, याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. जरांगे हे कुणाच्या हातातील बाहुले आहेत का, असाही प्रश्न लोकांच्या मनात घर करून आहे. आज जरांगे यांच्या उपोषणस्थळी अनेक आमदार, खासदार येऊन गेले. जरांगेंना पाठींबा दिला. हे सगळे विविध पक्षांचे आहेत, त्यांना वाटते आहे का, ओबीसीमधून हे आरक्षण देता येईल? य़ा आंदोलनाच्या निमित्ताने काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यात तथ्य आहेच. ज्या नेत्यांनी किंवा पक्षांनी आपल्या सत्ताकाळात मराठ्यांना आरक्षणाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या, ते आता जरांगेंना पाठिंबा देत आहेत. मग त्यांच्याच या बंदुका जरांगेंच्या खांद्यावर आहेत का?
मनोज जरांगे हे आता ओबीसीमधून आरक्षण द्या असे आमचे म्हणणे नाही, असे सांगत आहेत, मग कसे आरक्षण देणार हेही त्यांनी सांगून टाकले पाहिजे. मात्र सरकारने आरक्षण द्यावे नाहीतर मराठे रोजच्या रोज आणखी संख्येने मुंबईत येत राहतील. त्यामुळे आंदोलनाचा हा तिढा सुटण्याची चिन्हं नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार या पलीकडे मुंबईकरांची आता भावना नाही.







