केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (२७ ऑक्टोबर) मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’चे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताच्या सागरी सामर्थ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्राला या भव्य आंतरराष्ट्रीय आयोजनाचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत हा कार्यक्रम होणे, हा भारताच्या समुद्री इतिहासाला आणि आधुनिक सागरी प्रगतीला जोडणारा सन्मानाचा क्षण आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या विकासात मुंबई बंदर आणि जेएनपीए यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाच्या कंटेनर ट्रॅफिकमध्ये सर्वाधिक वाटा असणाऱ्या महाराष्ट्रातील बंदरांनी भारताच्या समुद्री क्षमतेला बळकटी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारले जाणारे वाढवण बंदर जगातील सर्वात मोठ्या १० बंदरांमध्ये स्थान मिळवेल. या प्रकल्पामुळे सागरी व्यापार, पुरवठा साखळी आणि जागतिक स्तरावरील भारताची भूमिका नव्याने अधोरेखित होईल. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेरीटाईम इंडिया व्हिजन’ आणि ‘मेरीटाईम अमृतकाळ व्हिजन’मध्ये हे बंदर मैलाचा दगड सिद्ध होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकास धोरण, २०२५’च्या माध्यमातून जहाज बांधणी क्षेत्रात एक सक्षम इकोसिस्टीम उभारण्याचा संकल्प केला आहे. तसेच, ‘पोर्ट लेड डेव्हलपमेंट’च्या माध्यमातून राज्यात लॉजिस्टिक व ब्लॉकचेन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी संधी निर्माण होत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक गुंतवणूकदारांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नवी सागरी शक्ती म्हणून उभा राहत आहे, तेव्हा या सागरी परिवर्तनाच्या प्रवासात भारतासोबत सामील व्हा आणि अमर्याद संधींचा लाभ घ्या.
हे ही वाचा :
पृथ्वी शॉने फटकावले फक्त १४१ चेंडूत दुहेरी शतक!
भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर
नितीश कुमार अॅक्शन मोडमध्ये, ४८ तासांत १६ बंडखोर नेत्यांची हकालपट्टी!
यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, हा क्षण भारताचा मेरीटाईम क्षण आहे. ‘गेटवे ऑफ इंडिया’ला ‘गेटवे ऑफ वर्ल्ड’मध्ये रूपांतरित करण्याचे विचारमंथन ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’मध्ये होणार आहे. येथे ₹१० लाख कोटींच्या गुंतवणुकीची निर्मिती होणार असून मोठ्या संधींची निर्मिती होणार आहे. यासोबतच त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करत भारतासोबत आपल्याही समृद्धीचा मार्ग प्रशस्त करण्याचे आवाहन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.







