भारतीय रेल्वे आपली विद्यमान प्रवासी आरक्षण प्रणाली (Passenger Reservation System – PRS) मोठ्या प्रमाणात अपग्रेड करत आहे. या बदलानंतर प्रणालीला मिनिटाला तब्बल १ लाख तिकिटांची हाताळणी करता येणार आहे. सध्या ही क्षमता २५ हजार तिकिटांची आहे.
रेल्वे केंद्रीय ‘क्रिस’ (Centre for Railway Information Systems) मार्फत हा संपूर्ण पुनर्गठन प्रकल्प राबवत आहे. यात हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क उपकरणे आणि सुरक्षा पायाभूत सुविधा नव्याने बसवली जातील. नवीन प्रणाली आधुनिक क्लाउड टेक्नॉलॉजीवर आधारित असेल.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, विद्यमान पीआरएस प्रणाली २०१० मध्ये कार्यान्वित झाली होती. ती जुन्या Itanium सर्व्हर आणि OpenVMS प्रणालीवर चालते, त्यामुळे आता ती अत्याधुनिक क्लाउड तंत्रज्ञानावर नेण्याची गरज आहे.
नवीन प्रणाली प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि बदलत्या प्रवासाच्या सवयी लक्षात घेऊन तयार करण्यात येत आहे. याच अनुषंगाने १ नोव्हेंबर २०२४ पासून आरक्षित तिकिटांचा अॅडव्हान्स आरक्षण कालावधी (ARP) १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणण्यात आला आहे. या निर्णयामुळे रद्द होणाऱ्या तिकिटांची संख्या कमी होईल, असा अंदाज आहे.
रेल्वेने अलीकडेच ‘रेलवन’ (RailOne) अॅप सुरू केले असून, यातून आरक्षित तसेच अनारक्षित दोन्ही प्रकारची तिकिटे मोबाईलवर बुक करता येतात.
सध्या पीआरएस प्रणाली मिनिटाला सुमारे २५ हजार तिकिटांची बुकिंग करू शकते. अपग्रेड झाल्यावर ही क्षमता चारपट वाढून १ लाख होईल.
याशिवाय, रेल्वेने नॉन-एसी डब्यांचा वाटा वाढवून सुमारे ७० टक्क्यांवर नेला आहे. पुढील पाच वर्षांत १७,००० अतिरिक्त नॉन-एसी डबे तयार करण्याचा विशेष उत्पादन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. २०२४-२५ मध्येच १,२५० नवे सामान्य डबे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जोडले गेले आहेत.







