भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या बाजूने सध्या शांततापूर्ण वातावरण आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध चालविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची देशासह जगभरात चर्चा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला दाखवून दिले कि, भारत स्वतःवरील हल्ले कधीही सहन करणार नाही, तर त्याच्यापेक्षा जोरदार दुश्मनावर प्रहार करेल. याच दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. तसेच भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई जगाने पाहिल्याचे म्हटले.
ते म्हणाले, भारतमातेच्या कपाळावर हल्ला करून अनेक कुटुंबांचे सिंदूर पुसणाऱ्या भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे न्याय दिला. यासाठी आज संपूर्ण देश भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन करत आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. हे ऑपरेशन भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि लष्करी सामर्थ्याचे, क्षमतेचे आणि दहशतवादाविरुद्धच्या दृढनिश्चयाचे देखील प्रदर्शन आहे. आम्ही दाखवून दिले आहे की जेव्हा जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई करतो तेव्हा सीमेपलीकडील जमीन देखील दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी सुरक्षित राहत नाही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (११ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ब्रह्मोस एरोस्पेसच्या एकत्रीकरण आणि चाचणी सुविधेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना ते पुढे म्हणाले, “भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. परंतु पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशावेळी भारतीय सैन्याने धैर्य, शौर्य तसेच संयम दाखवत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून त्यांना योग्य उत्तर दिले.
हे ही वाचा :
“इंग्लंडची कसोटी मोहिम – कोहली विना अशक्य?
ऑस्ट्रेलियात तिहेरी शतक झळकावणारे पहिले क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं निधन
‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, उरी घटनेनंतर संपूर्ण जगाने पाहिले की भारतात दहशतवादी घटना घडवून आणण्याचे परिणाम काय होतात. आपल्या सैन्याने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केले, पुलवामानंतर आपण बालाकोटवर हवाई हल्ले केले आणि आता पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानात घुसून केलेले अनेक हल्ले जग पाहत आहे. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाचे पालन करून, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की हा एक नवीन भारत आहे, जो सीमेच्या दोन्ही बाजूंनी दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई करतो.







