भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकत इतिहास रचला आहे. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करून किताब पटकावला. २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम टप्प्यावर पराभव पत्करावा लागला होता, मात्र २०२५ मध्ये भारतीय महिलांनी आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर विजयश्री मिळवली.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीसीसीआयने भारतीय संघाला तब्बल ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम आयसीसीने दिल्या जाणाऱ्या बक्षीसापेक्षा जास्त आहे. आयसीसी विजेत्या संघाला ४.४८ दशलक्ष डॉलर म्हणजेच अंदाजे ३९.७८ कोटी रुपये देणार आहे.
बीसीसीआय सचिव देबाजीत सैकिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “हा अत्यंत स्पर्धात्मक स्पर्धेतला विजय आहे आणि बीसीसीआय त्याबद्दल संपूर्ण संघाचे कौतुक करू इच्छिते. आयसीसीने महिलांच्या विश्वचषकाचे बक्षीस ३०० टक्क्यांनी वाढवले, याबद्दल जय शाह यांचेही आभार.”
हे ही वाचा:
“चीन तैवान कारवाई करणार नाही!” ट्रम्प यांचा दावा
अनिल अंबानींच्या ३००० कोटींच्या मालमत्ता गोठवल्या
भारतीय महिला संघाला मिळणार ३९ कोटी
ममतादीदी म्हणतात घुसखोरावर कारवाई करू नका
सैकिया पुढे म्हणाले, “बीसीसीआय आयसीसीकडून मिळणाऱ्या रकमेवर हात न लावता स्वतःकडून ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे. ही रक्कम खेळाडू, निवड समिती आणि अमोल मुजुमदार यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक स्टाफलाही दिली जाईल.”
भारताचा सर्वांगीण खेळ
अंतिम सामन्यात भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात वर्चस्व गाजवले. टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाठवले. शफाली वर्माने ८७ धावांची शानदार खेळी करत भारताला २९८ धावांपर्यंत नेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वूलवर्डने शतक झळकावले, पण दीप्ती शर्माने ५ बळी घेत सामना फिरवला आणि भारताला ५२ धावांनी विजय मिळवून दिला.
शफालीने गोलंदाजीतही हातखंडा दाखवत दोन बळी घेतले आणि तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयासोबत महिलांनी स्वतःचा ‘१९८३चा क्षण’ साधल्याची क्रीडा विश्वाकडून प्रशंसा होत आहे.
