31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषसूडाच्या आगीत भावनिक शिंतोडे कशाला?

सूडाच्या आगीत भावनिक शिंतोडे कशाला?

श्रीकांत शिंदे यांनी पत्र लिहिण्याऐवजी अरे ला कारे उत्तर द्यायला हवे होते

Google News Follow

Related

दसरा मेळाव्यात शिल्लक सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा अत्यंत शेलक्या शब्दात उल्लेख केला. ते कार्ट उद्या नगरसेवक पदावर डोळा ठेवेल, हे उद्धव ठाकरे यांचे उद्गार. ज्याच्याबद्दल गरळ ओकण्यात आली तो रुद्रांश जेमतेम दीड वर्षाचे बाळ. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या राजकीय वगनाट्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ.

कोणत्याही सुहृदय व्यक्तिला संताप येईल, डोक्यात जाण निर्माण होईल आणि तोंडात म कार आणि भ कार युक्त शिव्या येतील असा प्रकार ठाकरे यांनी केला. उत्तरही तेवढंच जळजळीत अपेक्षित होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे या तापलेल्या निखाऱ्यांवर भावनिक फुलके भाजत बसले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र पाठवण्याची नसती उठाठेव केली. हे पत्र नको इतके भावनिक आहे. सूडाने पेटलेल्या, हातात खंजीर घेऊन घात लावून बसलेली व्यक्ति या पत्राची दखल तरी घेईल काय?

रुद्रांशबद्दल तुम्ही जे बोलतात, ते तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का? तुम्ही ते ऐकून त्याची आई आणि आजी कमालीच्या दुखावल्या, धास्तावल्या. कोणता सुसंस्कृत माणूस असं बोलेल? असे भावनिक आणि बाळबोध प्रश्न या पत्रात विचारण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे कोणीतरी तुमच्या लहानग्याच्या कानफटीत मारल्यानंतर, तुम्हाला असं बोलणं शोभतं का असे विचारण्यासारखे आहे. शिंदेना हे न शोभणारे आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला भावनिक आवाहन करणे, त्याच्याकडून माणूसकीची अपेक्षा करणे हेच मुळात मूर्खपणाचे आहे. पोटच्या गोळ्याला कोणी अद्वातद्वा बोलले तर त्याची तशाच शब्दात श्रीकांत शिंदे यांनी पूजा केली असती तर ते त्यांना शोभलेही असते.

राज्यात २०१४ पासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अंतरंगात जी काही धुसफूस सुरू होती, त्यातून २०१९ चे महाभारत झाले. हे महाभारतच आहे. तिथे कपटाने पांडवांना वनवासात पाठवण्यात आले होते, इथे भाजपाला घरी बसवण्यात आले. त्यासाठी बंद दरवाजा आडची स्क्रीप्ट रचण्यात आली. पुढे त्यातून जे काही घडले ते लोकांच्या समोर आहे. भाजपाने महाविकास आघाडीचा सत्तेचा सारीपाठ उधळून लावत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपाची सत्ता आणली.

उद्धव हे अत्यंत कोत्या मनोवृतीचे आणि अत्यंत खुनशी आहेत. मुख्यमंत्री पद गमावण्याचे कारण त्यांच्यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आयुष्यभर उभा दावा मांडण्यासाठी पुरे आहे. उद्धव ठाकरे यांची मानसिकता काय? ते विरोधकांना कसे चिरडतात हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकरणातून समोर आले आहे. अशा मानसिकतेचा नेता सर्वस्व गमावल्यावर जसा थयथयाट करतो तेच उद्धव ठाकरे करतायत.

दसरा मेळाव्याच्या आधी, आता मी मास्क काढून बोलणार आहे, असे त्यांनी सूचक वक्तव्य केले होते. खिसयानी बिल्ली खंबा नोचे अशी हिंदीमध्ये म्हण आहे. उद्धव यांचे वागणे अगदी तसेच आहे. शिंदे गटाच्या दसऱा मेळाव्याला उद्धव यांचा सख्खा भाऊ जयदेव, स्मिता ठाकरे, बिंदा ठाकरे यांचा मुलगा निहार ही ठाकरे मंडळी आली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्टेजवर बसली होती. हे सर्वजण, राज ठाकरे दूरावले किंवा दूर केले गेले ते उद्धव यांच्या कोत्या मनोवृतीमुळे. अशा मनोवृत्तीचा माणूस कोणाच्याही भावनिक आवाहनाला कवडी इतकीही किंमत देईल काय?

उत्तर खरंतर सेना स्टाईलमध्ये दिलं गेले पाहिजे होतं. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयावर जेव्हा शिल्लक सैनिकांनी हल्ला केला, तेव्हा रस्त्यावर उतरून उद्धव यांना आव्हान देणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्यात हा भावनिक किडा कसा काय घुसला देव जाणे? महाभारत हे एक सूडनाट्य आहे. या महाकाव्याच्या अंतिम पर्वात काय घडले ते आठवा. महाराष्ट्रातील राजकारणात जे घडतेय ते का घडते आहे त्याची टोटल लागू शकेल.

भीमाच्या गदेचे तडाखे झेलून दुर्योधन अर्धमेला होऊन पडला होता. त्याही स्थितीत त्याने अश्वत्थाम्याला सेनापती नियुक्त केले. त्याने रातोरात चोरपावलांनी पांडवांच्या शिबीरात घुसून पाच जणांची हत्या केली. ते पांडव होते, असा त्याचा गैरसमज होता. परंतु ते पाच दौपदी पुत्र होते. पाच पांडवांपासून झालेली पाच अपत्य. पण जेव्हा सत्य अश्वत्थाम्याला समजले तेव्हा तो चवताळला. पांडव अजून जिवंत होते. त्याने पांडवांवर नारायणास्त्राचा प्रयोग केला. हे अस्त्र अत्यंत विनाशकारी आहे, तेव्हा ते तू मागे घे असे त्याला सांगण्यात आले. परंतु त्याला अस्त्र मागे घेण्याची कला साध्य नव्हती. अखेर हे अस्त्र उत्तरेच्या म्हणजे अभिमन्यूच्या पत्नीच्या गर्भावर जाऊन पडो, असे आदेश अश्वत्थाम्याने दिले. त्याने उत्तरेचा गर्भ नष्ट केला. केवळ श्रीकृष्णामुळे त्या गर्भाला नव संजीवनी मिळाली आणि तो पुन्हा जिवंत झाला.

हे ही वाचा:

सी लिंक अपघातातील SUV च्या डोक्यावर ३७ हजारांचा दंड

खासदार गोपाळ शेट्टींचा इशारा, SRA तील भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा फाडणार

आणि पेटलेले सिलेंडर रॉकेटसारखे हवेत झेपावले

भारतीय वायूसेनेने व्यापले अवघे आकाश!

 

महाभारत हा सूडाचा प्रवास होता. त्या प्रवासाची इतिश्री ही अशी झाली. हे एक क्रूर युद्ध होते. त्यामुळे धृतराष्ट्र आपल्या भावाच्या मुलांचा बळी द्यायला तयार झाला. अर्धमेल्या अवस्थेतही दुर्योधनाला पांडवांचा वंशविच्छेद हवा होता. बापाच्या हत्येमुळे संतापाने पेटलेल्या अश्वत्थाम्याला कोणत्याही थराला जाऊन पांडवांचा सूड हवा होता. गेलेली सत्ता पुन्हा मिळणार नाही याची खात्री झालेला सत्ताहीन, शक्तीहीन शत्रू जेव्हा सूडाने पेटतो, तेव्हा मस्तकात धगधगणारे द्वेषाचे निखारे त्याला काहीही करायला भाग पाडतात. मग महाभारत तेव्हाचे असो वा महाराष्ट्राच्या राजकारणातले. तिथे उत्तरेच्या गर्भाला लक्ष्य करण्यात आले. इथे रुद्रांशला टार्गेट करण्यात आले. अशी विकारांची आग जेव्हा भडकलेली असते तेव्हा भावनेचे शिंतोडे उडवून त्यांच्या वाफाच होतात.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा