आगामी आयपीएल २०२६साठी अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सने आता ऑस्ट्रेलियाच्या माजी सर्वांगीण खेळाडू शेन वॉटसन यांना संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. केकेआरने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर ही घोषणा केली.
केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर म्हणाले,
“शेन वॉटसनचे केकेआर परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव संघाच्या संस्कृतीत आणि तयारीत मोठा हातभार लावेल. टी२० क्रिकेटची त्यांची समज जागतिक दर्जाची आहे.”
सहाय्यक प्रशिक्षक झाल्यानंतर वॉटसनने प्रतिक्रिया दिली:
“केकेआरसारख्या प्रतिष्ठित फ्रँचायझीचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. केकेआरच्या चाहत्यांचा उत्साह आणि संघाची उत्कृष्टतेप्रती असलेली बांधिलकी मी नेहमीच पाहिली आहे. आणखी एक किताब जिंकण्यासाठी मी प्रशिक्षक गट आणि खेळाडूंबरोबर पूर्ण समर्पणाने काम करणार आहे.”
वॉटसनचा आयपीएलमधील अनुभव भक्कम आहे. खेळाडू म्हणून त्यांनी १४५ सामन्यांत ३,८७४ धावा (४ शतके, २१ अर्धशतके) आणि ९२ बळी घेतले आहेत. त्यांनी २०२२ आणि २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत वॉटसनने 58 सामन्यांत १ शतक, १० अर्धशतके आणि १,४६२ धावा केल्या असून ४८ विकेट्स घेतल्या आहेत.







