उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे चार धाम यात्रा विस्कळीत झाली आहे आणि अनेक जिल्ह्यांमधील स्थानिक जनजीवनावर परिणाम झाला आहे. भूस्खलनामुळे मार्ग बंद झाल्यानंतर केदारनाथ यात्राही तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
रुद्रप्रयागमध्ये, शनिवारी (२६ जुलै) पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास गौरीकुंड ते केदारनाथ हा पादचारी मार्ग भूस्खलनामुळे ढिगारा आणि दगड पडून मार्ग बंद झाला. अधिकाऱ्यांनी या मार्गावरील वाहतूक थांबवली आहे आणि मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी पहाटे, अगस्त्यमुनीच्या बेदू बागड परिसरातील रुमसी ओढा संततधार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागला. केदारनाथ महामार्गाजवळील अनेक घरे, हॉटेल्स आणि पार्किंग क्षेत्रे पाण्याखाली गेली आहेत.
अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दुचाकी गाड्या पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी उत्तरकाशीमध्ये, यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे १०० मीटरचा भाग फूलचट्टीजवळ कोसळला, ज्यामुळे सर्व वाहनांची वाहतूक खंडित झाली.
दरम्यान, बागेश्वर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी कापकोट ब्लॉकमध्ये ७४ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. भूस्खलनामुळे परिसरातील नऊ रस्ते बंद झाले होते आणि ५७ जेसीबी मशीन्स सफाई आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
मालेगाव स्फोट प्रकरण : ३१ जुलै रोजी एनआयए न्यायालय निर्णय सुनावण्याची शक्यता
काँग्रेस देशाचाच विरोध करू लागलीय
सीएसएमटी स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी
तमिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान करणार ४८०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन
टिहरीच्या बालगंगा तहसीलमध्ये शनिवारी सकाळी नागेश्वर सौदजवळ रस्त्यावर एक मोठे झाड कोसळले. यामुळे उत्तरकाशी-केदारनाथ चार धाम मोटार मार्गात अडथळा निर्माण झाला आहे, कावड यात्रेकरू, चार धाम यात्रेकरू आणि स्थानिक प्रवाशांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हवामान खात्याने पुढील ४८ तासांत देहरादून, टिहरी, नैनिताल, बागेश्वर आणि चंपावत येथे मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मार्ग धोकादायक असल्याने, अधिकाऱ्यांनी स्थानिक आणि यात्रेकरूंना प्रवास करण्यापूर्वी हवामान अपडेट्स तपासण्याचे आवाहन केले आहे.







