भारताच्या अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यात ६१ धावांची नाबाद खेळी साकारली, पण भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी जडेजाच्या फलंदाजीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याने “जिंकण्याची मानसिकता” दाखवली नाही असा ठपका ठेवला आहे.
३८.२ षटकांत १९३ धावांचे लक्ष्य, शेवटच्या दिवशी केवळ जडेजाच प्रमुख फलंदाज उरलेला, तरीसुद्धा सामना फिरवण्यात अपयश – चॅपल यांच्या मते इथेच रणनीती चुकली!
“जडेजा जे करतो तेच त्याने केलं – शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणं, स्ट्राइक कंट्रोल करणं, पण सामना जिंकायचा तर त्याला थोडं धाडस दाखवायला हवं होतं,” चॅपल यांनी ESPNcricinfo साठी लिहिलेल्या कॉलममध्ये नमूद केलं.
जडेजा व बुमराहमध्ये ३५, तर सिराजसोबत २३ धावांची भागीदारी झाली, पण सामना हातातून गेला.
चॅपल यांनी २०१९ मधील हेडिंग्ले कसोटीत बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या पराक्रमी खेळीचं उदाहरण देत स्पष्ट केलं की अशा क्षणी ‘माझ्यावर टीमचा विश्वास आहे’ ही भावना खेळाडूला सामर्थ्य देते.
“जोखीम घ्यायला हवी होती, विजयासाठी प्रयत्न करायला हवा होता. पुछल्ले फलंदाज केवळ साथ देतील, सामना जिंकण्याचं ध्येय जडेजानेच पेलायला हवं होतं,” असा सल्ला त्यांनी दिला.
भारत सध्या ५ कसोटी मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. पुढील दोन सामने निर्णायक ठरणार आहेत.







