जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि आरोग्यदायी आहार घेण्याचा विचार करत असाल, तर प्रोसेस्ड अन्नापासून लांब राहणं तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या एका संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की कमी प्रोसेस्ड (मिनिमली प्रोसेस्ड) अन्न खाल्ल्यास वजन दुप्पट वेगाने घटू शकतं, तुलनेत ज्यांनी अधिक प्रोसेस्ड (अल्ट्रा प्रोसेस्ड) अन्न खाल्लं.
या अभ्यासात, यूसीएलच्या संशोधकांनी दोन प्रकारचे आहार तयार केले –
१) एमपीएफ (मिनिमली प्रोसेस्ड फूड) – जसे ओव्हरनाईट ओट्स, घरी बनवलेली स्पेगेटी बोलोनेज
२) यूपीएफ (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड) – उच्च प्रोसेस्ड, पॅकेज्ड पदार्थ
‘नेचर मेडिसिन’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सहभागी असलेल्या ५५ प्रौढांना दोन गटात विभागण्यात आलं.
८ आठवडे प्रत्येक गटाने वेगवेगळा आहार घेतला.
परिणाम असे दिसून आले की दोन्ही गटांचं वजन कमी झालं, मात्र एमपीएफ आहार घेणाऱ्यांचं वजन २.०६ टक्क्यांनी, तर यूपीएफ आहार घेणाऱ्यांचं वजन फक्त १.०५ टक्क्यांनी कमी झालं.
यूसीएलच्या डॉ. सॅम्युअल डिकेन म्हणाले, “दोन्ही डाएट्समध्ये पोषण तत्त्वे एकसारखी होती, पण कमी प्रोसेस्ड अन्नामुळे वजन घटण्याचा वेग दुप्पट दिसून आला.”
यूसीएलच्या संक्रमण व प्रतिकारशक्ती विभागाचे प्राध्यापक क्रिस वॅन टुल्लेकेन यांनी सांगितले, “लठ्ठपणाचं कारण फक्त वैयक्तिक सवयी नसून, आजूबाजूचं अन्न-पर्यावरण हेही तितकंच जबाबदार आहे.”







