मध्य प्रदेशातील व्यापारी नगरी इंदौरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) महानगरपालिकेतील झाडांची खरेदी प्रकरणातील गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून उद्यान अधिकारी चेतन पाटील यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापा टाकला आहे. सुरुवातीच्या तपासणीत सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. चेतन पाटील सुमारे २० वर्षांपूर्वी मास्टर कर्मचारी म्हणून महापालिकेत रुजू झाले होते, आणि सध्या उद्यान अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात सुमारे चार कोटी रुपयांच्या झाडांची खरेदी झाली, ज्यामध्ये गंभीर अनियमिततेच्या तक्रारी EOW कडे करण्यात आल्या होत्या.
EOW ने तक्रारींची चौकशी करून न्यायालयाची परवानगी घेतली आणि मंगळवारी सकाळी त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू केली. EOW चे पोलिस अधीक्षक आर. एस. यादव यांनी आयएएनएसला सांगितले, की चेतन पाटील यांच्या विरोधात दोन स्वतंत्र तक्रारी मिळाल्या होत्या — एक अधिक उत्पन्नाची मालमत्ता बाळगल्याबद्दल आणि दुसरी चार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या झाडांची खरेदी करताना गैरव्यवहार केल्याबद्दल. या दोन्ही तक्रारींचा प्राथमिक तपास केल्यानंतर कारवाई करण्यात आली.
हेही वाचा..
अहमदाबाद विमान अपघात : १४४ जणांचे डीएनए नमुने जुळले
कोझिकोड सेक्स रॅकेट प्रकरण : केरळचे दोन पोलीस अटकेत
जातनिहाय जनगणा : काँग्रेसचा खोटारडेपणा उघड
१८ जूनलाच कालाष्टमी साजरी होणार, जाणून घ्या का ?
यादव यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान दोन भूखंड, एक निवासस्थान, २५ लाखांच्या विमा पॉलिसीज, २० लाखांचे सोने आणि १ लाखांपेक्षा जास्त रोकड मिळाली आहे. एकूण मिळालेली मालमत्ता सुमारे १.८५ कोटी रुपये एवढी आहे. त्यांचा एकूण वेतन उत्पन्न केवळ १५ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या मिळालेल्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू आहे आणि त्यांच्या अधिकृत उत्पन्नाचा तपास चालू आहे. उद्यान अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यालयात अजूनही EOW ची छापेमारी सुरू असून, यापुढे आणखीही मालमत्तेचा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







