मुंबईसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, एनडीआरएफची पथके सज्ज

नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, एनडीआरएफची पथके सज्ज

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबईत सलग चौथ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून गेल्या २४ तासांत शहरातील काही भागांमध्ये १५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाचा वेग लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केले असून पाणी उपसा यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि अग्निशमन दलाला सज्ज ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
रोनाल्डोचा ऐतिहासिक गोल

बिसूरमध्ये मशिदीशेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना प्रचंड त्रास

श्री तुळजाभवानीदेवीच्या जमीन महाघोटाळ्याच्या चौकशीचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

राष्ट्रवादी बंगाली तरुणांना हाक, लवकरच २.५ लाख युवक होणार संघस्वयंसेवक

दरम्यान, कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६९ मिमी पावसाची नोंद झाली असून अनेक नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी ४.९० मीटरपर्यंत पोहोचली असून ती धोक्याच्या ५ मीटर मर्यादेच्या अगदी जवळ आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पाचव्या बटालियनने महाराष्ट्र आणि गोव्यातील संवेदनशील भागांमध्ये बचाव पथके पूर्वतयारी म्हणून तैनात केली आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव आणि नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये ही पथके आवश्यक साहित्य आणि आधुनिक बचाव उपकरणांसह सज्ज ठेवण्यात आली आहेत.

हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. विशेषतः घाटमाथा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी, नाले आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version