नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे झालेल्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या गणेशोत्सव विषयावरील चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने सादर केलेल्या या चित्ररथाने देशभरातील प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली. यावेळी जम्मू-काश्मीरला द्वितीय, तर केरळला तृतीय क्रमांक मिळाला.
यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना “गणेशोत्सव : परंपरा, संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक” अशी होती. या चित्ररथातून महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाची दीर्घ परंपरा, सामाजिक एकोपा आणि आर्थिक योगदान यांचा सुंदर मिलाफ प्रभावीपणे सादर करण्यात आला. गणपती बाप्पाची भव्य मूर्ती, पारंपरिक सजावट, ढोल-ताशांचा नाद आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा चित्ररथ विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
हे ही वाचा:
अजितदादांचा विमान अपघाताच्या चौकशी व्हावी
अॅमेझॉनकडून १६ हजार कर्मचाऱ्यांना नारळ
भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा बूस्टर
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकतेचा, बंधुभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जातो. तसेच या काळात मूर्तिकार, सजावटकार, फुलविक्रेते, कलाकार, मंडप व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. या आर्थिक साखळीवर प्रकाश टाकत, चित्ररथातून ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला अधोरेखित करण्यात आले.
या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशातील विविध राज्ये तसेच केंद्र सरकारच्या विभागांचे अनेक चित्ररथ सहभागी झाले होते. मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ विषयाची स्पष्ट मांडणी, कलात्मक सादरीकरण आणि सामाजिक संदेशामुळे इतरांपेक्षा सरस ठरला. त्यामुळे परीक्षक समितीने महाराष्ट्राला प्रथम क्रमांक देण्याचा निर्णय घेतला.
या यशाबद्दल राज्यभरातून आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि लोकपरंपरांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मोठी दाद असल्याचे मानले जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मंचावर गणेशोत्सवाचे हे दर्शन देशातील विविधतेत एकता या संकल्पनेचे प्रभावी प्रतीक ठरले आहे.







