जगातील सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ऍप व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी मोठे प्रायव्हसी अपडेट घेऊन येत आहे. लवकरच वापरकर्त्यांना मोबाइल नंबर न सांगताही फक्त युजरनेमच्या माध्यमातून इतरांशी संपर्क साधता येणार आहे. या फीचरची घोषणा व्हॉट्सअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुणाल शाह यांनी केली असून, सर्व वापरकर्त्यांना आपले पसंतीचे युजरनेम आताच रिझर्व्ह करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्हॉट्सअपने २९ जूनपासून जगभरात टप्प्याटप्प्याने युजरनेम रिझर्वेशन प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्ण फीचर यावर्षीच्या उत्तरार्धात सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. संबंधित पर्याय उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्त्यांना ऍपमध्ये नोटिफिकेशनद्वारे माहिती दिली जाईल.
आता नंबर शेअर करण्याची गरज नाही
आजपर्यंत व्हॉट्सअपवर नवीन व्यक्तीशी संवाद सुरू करण्यासाठी मोबाइल नंबर देणे आवश्यक होते. त्यामुळे अनेकदा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करावी लागत होती. नवीन युजरनेम फीचरमुळे ही अडचण दूर होणार आहे. यापुढे वापरकर्ते आपला फोन नंबर न देता केवळ एक युनिक युजरनेम शेअर करून संवाद साधू शकतील. विशेष म्हणजे हा सोशल मीडिया हँडलप्रमाणे सार्वजनिक प्रोफाइल नसेल. व्हॉट्सअपवर युजरनेमची कोणतीही सार्वजनिक निर्देशिका (Directory) किंवा सर्च सुविधा दिली जाणार नाही. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी तिचे अचूक युजरनेम माहिती असणे आवश्यक असेल.
व्हॉट्सअप या फीचरसह ‘युजरनेम की’ नावाचे अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यही आणत आहे. हा पर्याय ऐच्छिक असेल. जर वापरकर्त्याने युजरनेम की सुरू केली, तर नवीन व्यक्तीला संदेश पाठवण्यासाठी केवळ युजरनेम पुरेसे ठरणार नाही. त्या व्यक्तीकडे युजरनेमसोबतच सुरक्षा की देखील असणे आवश्यक असेल. यामुळे अनोळखी व्यक्तींकडून होणारे अवांछित संदेश कमी होतील आणि गोपनीयता अधिक मजबूत होईल. ही की, वापरकर्त्याला कधीही बदलता येणार आहे.
युजरनेम कसा रिझर्व्ह कराल?
व्हॉट्सअपने युजरनेम रिझर्व्ह करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी ठेवली आहे.
- सर्वप्रथम व्हॉट्सअपचे नवीनतम (Latest) व्हर्जन अपडेट करा.
- Settings मध्ये जा.
- Account हा पर्याय निवडा.
- युजरनेमवर क्लिक करा.
- उपलब्ध असलेले आवडते युजरनेम निवडा आणि ते निश्चित (Confirm) करा.
कोणासाठी ठरणार अधिक फायदेशीर?
हे फीचर सामान्य वापरकर्त्यांसह Content Creators, व्यवसाय, संस्था आणि ब्रँड्स यांच्यासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. व्हॉट्सअपने सांगितले आहे की, शक्य असल्यास वापरकर्त्यांना त्यांच्या Instagram किंवा Facebook खात्यावरील युजरनेम प्रमाणेच युजरनेम मिळू शकतो. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवर एकसमान ओळख राखणे सोपे होईल.
युजरनेमसाठी असतील काही नियम
व्हॉट्सअपनुसार युजरनेमची लांबी ३ ते ३५ अक्षरांपर्यंत असू शकते. वापरकर्त्यांना नंतर तो बदलण्याची किंवा हटवण्याचीही सुविधा असेल. याशिवाय प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी, सार्वजनिक पदाधिकारी आणि मोठ्या ब्रँड्सची नावे आधीच राखीव ठेवली जाणार आहेत, जेणेकरून बनावट खाती (Impersonation) तयार होऊ नयेत.
जुन्या चॅटवर कोणताही परिणाम नाही
या बदलामुळे सध्याचे व्हॉट्सअप चॅट, संपर्क यादी किंवा ग्रुप्समध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या व्यक्तींकडे आधीपासून तुमचा मोबाइल नंबर आहे, त्या नेहमीप्रमाणेच संवाद साधू शकतील. तसेच End-to-End Encryption, Block, Report यांसारखी सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.
टप्प्याटप्प्याने होणार रोलआउट
व्हॉट्सअपने स्पष्ट केले आहे की युजरनेम फीचर सर्व देशांमध्ये एकाच वेळी उपलब्ध होणार नाही. पुढील काही महिन्यांत हे फीचर टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल. वापरकर्त्यांच्या प्रदेशात ही सुविधा उपलब्ध होताच व्हॉट्सअपमध्ये अधिकृत सूचना पाठवली जाईल.







