बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये साउथ आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात साउथ आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज मारिजान कप्प हिने ५ बळी घेत इतिहास रचला. कप्प आता महिला वनडे वर्ल्ड कप इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे!
मारिजान कप्पनं ७ षटकांत फक्त २० धावा देत ५ विकेट घेतल्या आणि तिच्या नावावर आता वर्ल्ड कपमधील एकूण ४४ विकेट्स जमा झाल्या आहेत. या कामगिरीने तिने भारताच्या दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामी यांचा विक्रम मोडीत काढला. झूलननं २००५ ते २०२२ दरम्यान ३४ सामन्यांत ४३ विकेट्स घेतल्या होत्या.
या यादीत आता कप्प अव्वल असून, ऑस्ट्रेलियाच्या लिनेट एन. फुलर्टन आणि मेगन शट या प्रत्येकी ३९ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सामन्याचा आढावा:
पहिल्यांदा फलंदाजी करत साउथ आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद ३१९ धावा केल्या.
कर्णधार लौरा वोल्वार्ड्ट हिने १४३ चेंडूंमध्ये २० चौकार आणि ४ षटकारांसह भारी १६९ धावा ठोकल्या.
ताजमिन ब्रिट्झने ४५, तर कप्पने फलंदाजीतही हातभार लावत ४२ धावा केल्या.
इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन हिने ४४ धावांत ४ विकेट घेतल्या, तर लॉरेन बेलला २ विकेट मिळाल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजी कोलमडली. कर्णधार नेट सायव्हर-ब्रंट (६४) आणि एलिस कॅप्सी (५०) व्यतिरिक्त कोणीच लढा देऊ शकले नाहीत. इंग्लंडचा डाव ४२.३ षटकांत फक्त १९४ धावांत संपला.
कप्प हिने ५ बळी घेत सामन्याचा निकालच ठरवला. तिच्यासोबत नादिन डी क्लार्कने २ विकेट घेतल्या.







