पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात बुधवारी पहाटे हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू, तर ६ जण जखमी झाले आहेत. न्यू मार्केट परिसरातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील हॉटेलमध्ये पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मृतांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. हे नागरिक उपचारासाठी कोलकात्यात आले होते.
माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून आगीची सुरुवात झाली आणि काही वेळातच धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. रात्रीच्या वेळी अनेकजण झोपेत असल्याने बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले. काही जण धुरामुळे बेशुद्ध झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.
या दुर्घटनेत ६ पुरुष, २ महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार एअर कंडिशनरमध्ये स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनेचा तपास सुरू असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली आहे.
हे ही वाचा:
चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश
गॉल कसोटीत विजयासाठी भारताला ६ विकेट्स गरज
काझीरंगाभोवतीचा १० किमी संवर्धन पट्टा घटवण्याचा सरकारचा प्रस्ताव
केरळममधील काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना दाखवला आरसा
दरम्यान, हॉटेलमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही अहवालांनुसार इमारतीत आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग आणि आधुनिक अग्निशमन सुविधा पुरेशा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर हॉटेल्समधील अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
