दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला हवेतच धुराचा इशारा मिळाल्यानंतर लखनऊ येथे आपत्कालीन लँडिंग करावी लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत सर्व १४८ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित राहिले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बागडोगरा (पश्चिम बंगाल) येथून दिल्लीकडे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे IX-१५२३ हे विमान (एअरबस A320) सोमवारी सायंकाळी प्रवास करत होते. दरम्यान, विमानाच्या ‘एव्हिऑनिक्स बे’ (इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असलेला भाग) मध्ये धुराचा अलर्ट मिळाला. ही बाब गंभीर मानत वैमानिकाने तत्काळ “मे डे” कॉल दिला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर जीवितास धोका असल्याचे संकेत देतो.
हे ही वाचा:
युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईचा मोठा दिलासा
धक्का बसला जगाला! पाकिस्तानची पुन्हा नाचक्की
इंडिगोच्या नेतृत्वात मोठा बदल; विल्यम वॉल्श नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
संघशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील डॉक्टरांची राष्ट्रवंदना
यानंतर लखनऊमधील चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) सतर्क करण्यात आले आणि विमानाला तातडीने तेथे वळविण्यात आले. सुमारे सायंकाळी ५.१५ ते ५.२० च्या दरम्यान विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानतळावर तातडीची आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. कोणालाही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
घटनेनंतर संबंधित विमान ‘Aircraft on Ground’ (AOG) म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचा अर्थ विमानात तांत्रिक बिघाड असल्यामुळे ते सध्या उड्डाणासाठी वापरता येणार नाही आणि त्याची सखोल तपासणी व दुरुस्ती केली जाईल. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रवाशांना लखनऊ येथे आवश्यक सुविधा देण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांना पर्यायी फ्लाइटद्वारे दिल्लीला पाठवण्यात आले. काही प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची सोयही करण्यात आली.
ही घटना पुन्हा एकदा विमान वाहतुकीतील सुरक्षा यंत्रणा किती सजग आहे हे दाखवते. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि १४८ प्रवाशांचे प्राण वाचले. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.







