पुण्यातील बहुचर्चित पोर्श अपघात प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. मंगळवारी (१५ जुलै) बाल न्याय मंडळाने असा निर्णय दिला की आरोपी अल्पवयीन व्यक्तीवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार नाही. १७ वर्षीय आरोपी मुलावर प्रौढ खटला चालवावा अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. मात्र, पुणे पोलिसांची ही मागणी बाल न्याय मंडळाने (जेजेबी) फेटाळून लावली आणि आरोपीवर अल्पवयीन म्हणून खटला चालवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. अपघाताच्या वेळी आरोपी १७ वर्षे ८ महिन्यांचा होता.
दरम्यान, आरोपीला प्रौढ म्हणून खटल्याला सामोरे जावे लागणार नाही, हा बाल न्याय मंडळाचा निर्णय पीडितांच्या कुटुंबांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कट, पुराव्यांशी छेडछाड आणि प्रभावशाली लोकांचे संगनमत उघडकीस आले असताना, आरोपीला अल्पवयीन ठरवून त्याचे संरक्षण करणे योग्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.







