गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी अतिरिक्त लोकल-मेट्रो धावणार

गणेशभक्तांचा प्रवास सुकर करण्यासाठी विशेष फेऱ्या

गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी अतिरिक्त लोकल-मेट्रो धावणार

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर आणि गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी लोकल रेल्वे आणि मेट्रो सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमधून मोठ्या संख्येने भाविक गणेशदर्शनासाठी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रोवर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांची बैठक घेत प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त फेऱ्या, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले.

गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबरोबरच गरजेनुसार रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. गणेशदर्शनासाठी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे शेवटची मेट्रो वेळेत मिळावी आणि भाविकांना सुरक्षितपणे घरी परतता यावे, यासाठी सेवा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांवर तिकीट काऊंटर, क्यूआर तिकीट व्यवस्था, लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे पूर्ण क्षमतेने उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
मुलाला वाचवताना वडीलही दरीत कोसळले; आईनेही घेतली उडी

मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार

झुकरबर्गने आयर्लंडमध्ये ३३५ कोटींचा किल्ला खरेदी केला

दिल्लीतील ७०० कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित देशाबाहेर पसार

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवरही गणेशोत्सवाच्या काळात अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल चालवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळेत तसेच रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्यानुसार लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत नियमित मेगाब्लॉक आणि रात्रकालीन ब्लॉक टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, जेणेकरून गणेशभक्तांच्या प्रवासात अडथळे निर्माण होणार नाहीत.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रमुख रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. रेल्वे सुरक्षा दल तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन केले जाणार असून, संवेदनशील स्थानकांवर विशेष क्राऊड मॅनेजमेंट पथकेही कार्यरत राहणार आहेत. लोकल आणि मेट्रोच्या वेळापत्रकातील बदलांची माहिती प्रवाशांना उद्घोषणा, डिजिटल डिस्प्ले आणि अधिकृत माध्यमांतून देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील सर्वात मोठा उत्सव असल्याने या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अतिरिक्त लोकल आणि मेट्रो फेऱ्या, मेगाब्लॉकला मर्यादा, रात्रीपर्यंत वाहतूक सेवा आणि कडक सुरक्षा व्यवस्था यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Exit mobile version