32 C
Mumbai
Tuesday, March 3, 2026
घरविशेषपंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि भारत -इस्रायल मैत्रीचा अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि भारत -इस्रायल मैत्रीचा अर्थ

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय इस्रायल दौर्‍यामध्ये भारत आणि इस्रायल यांच्यातील सामरिक, तंत्रज्ञान आणि आर्थिक भागीदारीला नवे बळ मिळाले आहे. जेरुसलेममध्ये पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, कृषी, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांत अनेक करार आणि सामंजस्य करार (MOU) करण्यात आले. हे करार दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत आणि बहुआयामी बनवणारे ठरतील यात शंका नाही. या करारांमुळे संशोधन, व्यापार आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढेल. विशेषतः एआय, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंटस्मध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत.गेली तीन-चार वर्षे संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे युद्ध क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचे वास्तव जगासमोर आले. अशा परिस्थितीत पूर्वनियोजित हल्ले, सखोल गुप्तचर यंत्रणा, बहुआयामी मोहिमा आणि प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. या पार्श्वभूमीवर भारत इस्रायल यांच्यातील दोस्ती निर्णायक ठरणार आहे..

इस्रायली संसदेत “मोदी, मोदी” गजर
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान या नात्याने इस्रायलचा दुसरा दौरा यथासांग पार पडला. पश्चिम आशिया क्षेत्रावर सध्या भीषण युद्धाचे काळे ढग जमा झाले आहेत. अशा परिस्थितीत मोदी यांचे इस्रायलमध्ये जाणे याला त्यांच्या धाडसी राजकीय धोरणाचे आणि भारताच्या राजनैतिक दृढतेचे द्योतक म्हणावे लागेल. मोदी यांचे इस्रायलमध्ये खूपच उत्साहाने आणि आत्मीयतेने स्वागत झाले. इस्रायली संसदेपुढे (क्नेसेट) भाषण करण्याचा बहुमान मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. या भाषणाच्या वेळी मोदींना इस्रायली संसद अध्यक्षांकडून सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी ‘पॅलेस्टिनी ऑथोरिटी’ कडूनही मोदी यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला होता.एकमेकांशी दशकानुदशके हाडवैर जोपासणाऱ्या दोन देशांनी एखाद्या त्रयस्थ देशाच्या सर्वोच्च नेत्याला कोणत्याही अटी-शर्तीखेरीज सन्मानपूर्वक वागणूक देत गौरवणे त्या नेत्याच्या आणि त्याच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामर्थ्य आणि स्वीकारार्हतेला दर्शवते. यापूर्वीही रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असूनही पंतप्रधान मोदी यांच्याबाबत त्या दोन्ही देशांनी असाच सन्मान दर्शवला होता. यातून भारताचे ख्यातीमुल्य (गुडविल), सामर्थ्य आणि स्वीकारार्हता यांच्यात केवढी वाढ झाली आहे हे दृष्टोत्पत्तीस येते.

हे ही वाचा:

सोने-चांदीच्या दरात जबरदस्त उसळी

पश्चिम आशियातील संघर्षाबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

रुपया कोसळला! डॉलरसमोर ९१.३२ ची ऐतिहासिक पातळी गाठली

सलीम वास्तिक हल्ला प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

आपल्या इस्राईल दौऱ्याच्या दरम्यान मोदी यांनी इस्राईल-हमास-इराण यांच्यातील संघर्षाबाबत भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवादावर विशेष भर दिला, हे भारताने दहशतवादाच्या संदर्भात आजवर सातत्याने घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत असल्याने स्वाभाविक आहे. ‘हमास’ने ७ऑक्टोबर २०२४ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख करून, मोदी यांनी त्याचा कठोर शब्दात निषेध केला. जगाला आज सर्वाधिक धोका हा दहशतवादापासून असून, भारत व इस्रायल हे दोन देश त्याचे सर्वात मोठे बळी ठरले आहेत.मोदी यांनी इस्रायली संसदेपुढे केलेल्या भाषणात, या दोन्ही देशांमध्ये हजारो वर्षांपासून असलेले सांस्कृतिक संबंध अधोरेखित केले. ज्यू-धर्मियांना आपल्या समाजात सामावून घेणारा आणि त्यांचा छळ न करणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपली कृतज्ञताही व्यक्त केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि मोदी यांच्यात वैयक्तिक स्वरूपाचे मैत्रीसंबंध असल्याचा लाभही या दोन देशांना होत आहे.

१७ सामंजस्य करार

भारत आणि इस्रायल यांच्यात या दौऱ्याच्या दरम्यान जवळपास १७ क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले. त्यात शेतीपासून संरक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. यातील संरक्षण क्षेत्रातील करारांना विशेष महत्त्व आहे याचे कारण असे की, जग आज अतिशय धोकादायक अस्थैर्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता चार वर्षे पूर्ण झाली अजून, ते अजून किती दिवस चालेल हे कोणीही सांगू शकत नाही. अमेरिका आणि इराण यांच्यात देखील केव्हाही युद्धाचा भडका उडू शकतो. इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या युद्धबंदी असली, तरी तेथे कधीही संघर्ष सुरू होऊ शकतो. चीन तैवानचा घास घेण्यास टपून बसला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता असली, तरी पाकिस्तानमध्ये अंतर्गत अशांततेचा स्फोट होत आहे. शिवाय, त्या जिहादी देशाचे अफगाणिस्तानशी अघोषित युद्ध सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर भारत-इस्रायल यांच्यातील संरक्षणविषयक कराराचे महत्व अधिकच वाढते. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण-सिद्धतेत विलक्षण सुधारणा केली आहे. एकेकाळी संरक्षण सामग्रीचा निव्वळ आयातदार देश असलेला भारत, आज उच्च तंत्रज्ञानावर आधारित अनेक शस्त्रास्त्रे निर्यात करू लागला आहे. संरक्षणाच्या काही क्षेत्रांमध्ये तो स्वयंपूर्ण बनला असला, तरी अनेक बाबतीत त्याला अत्याधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रांची गरज भासते. ती गरज पूर्ण करण्यासाठी भारत-इस्रायल यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध आवश्यक आहेत.

कृषी क्षेत्रात भारत-इस्रायल इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. ड्रिप इरिगेशन, कीड नियंत्रण आणि हरितगृह शेती यासाठी इस्रायल भारताला सहकार्य करणार आहे. मासेमारी आणि मत्स्यव्यवसाय, भूभौतिकीय संशोधन, राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (लोथल) च्या विकासासाठी देखील करार झाले. सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या संदर्भातील करारावरसुद्धा स्वाक्षर्‍या झाल्या.

शिक्षण क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य वाढवण्याचा करार झाला असून विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायबर केंद्राची स्थापनेच्या संदर्भातील आणि व्यावसायिक मध्यस्थता करार देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

इस्रायलमध्ये भारतीय ‘यूपीआय’

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्याच्या दरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेअंती भारताची ‘यूपीआय’ पेमेंट सिस्टीम आता इस्रायलमध्ये लागू केली जाईल, असा निर्णय मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात घेण्यात आला. त्यामुळे रुपयाचे जागतिकीकरण होणार असून डॉलरवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

इराण आणि इस्रायल संघर्षाने भारताचे नुकसान

भारताच्या दृष्टीने इराण आणि इस्रायल ही दोन्ही मित्रराष्ट्र आहेत. त्या दोन्ही राष्ट्रांशी भारताचा मोठ्या प्रमाणावर व्यापार आहे. इराणमध्ये एकूण जेवढ्या बासमती तांदुळाची आयात करण्यात येते, त्यापैकी ३५ टक्के बासमती तांदुळाची आयात भारतातून केली जाते. भारत आणि इराण यांच्यातील द्विपक्षीय व्यापारी संबंधांचे हे केवळ एक उदाहरण आहे. भारताच्या दृष्टीने विचार करता, इस्राईल आणि इराण या दोन्ही राष्ट्रांशी व्यापार तूट नसली तरी त्यांच्यात संघर्ष चिघळला तर व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणे अनिवार्य आहे. त्याशिवाय इराणनजीक असणार्‍या होर्मुज सामुद्रधुनीचा जलमार्ग बाधित झाला तर भारताला त्याचा फटका बसेल. भारत जेवढ्या कच्च्या तेलाची आयात करतो, त्यापैकी ४५ टक्के तेल या मार्गाने येते. नैसर्गिक वायूच्या आयातीपैकी निम्मा पुरवठा देखील या मार्गाने होतो. हा जलमार्ग बाधित होण्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडेल.

त्याखेरीज इराणमध्ये संघर्ष सुरु झाला तर चाबहार बंदराचे भवितव्य काय असेल हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. इराण आणि भारताच्या संयुक्त गुंतवणुकीतून हे बंदर विकसित केले आहे. रशिया, इराण आणि भारत यांच्या संयुक्त पुढाकारातून विकसित होत असलेला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर भारतीय उपसागर आणि पर्शियन आखाताला जोडणार आहे. चबहार बंदर हा त्याच कॉरिडॉरवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प. त्यामुळे भारत थेट अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि युरोपशी जोडला जाईल. सुवेझ कालव्याला पर्याय ठरण्याची क्षमता असणार्‍या या जलमार्गाबरोबरच चाबहार बंदराचे व्यूहात्मक महत्त्व देखील विचारात घेणे आवश्यक आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानमध्ये विकसित करण्यात आलेल्या ग्वादर बंदराला शह देण्याची आणि चीनचा प्रादेशिक प्रभाव कमी करण्याची क्षमता चाबहार बंदरात आहे. अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षात पश्चिम आशियाचा भूगोल आणि इतिहास बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत चाबहार बंदराचे भवितव्य हा कळीचा मुद्दा आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्याचे पर्यवसान युद्धात झाल्यास परिणाम जगभर जाणवतील. पुरवठा साखळ्या बाधित होण्यापासून प्रादेशिक समतोल बिघडण्यापर्यंत अनेक उलथापालथी घडू शकतील. रशिया-युक्रेन युद्धाचे सावट कायम असताना इस्रायल-इराण हा धुमसणारा संघर्ष म्हणजे नव्या युद्धाची नांदी ठरू शकते.

रणांगणात एकमेकांविरुद्ध उभ्या असलेल्या दोन्ही राष्ट्रांचा भारत हा मित्रदेश असू शकतो, ही अपवादात्मक आणि अभूतपूर्व कामगिरी मोदी यांनी आपल्या राजनैतिक मुत्सद्देगिरीने आणि भारताच्या आर्थिक ताकदीवर साध्य करून दाखविली आहे. रशिया आणि युक्रेन, तसेच इराण आणि इस्रायल या देशांशी भारताच्या संबंधांची व्याप्ती मैत्री ते सौहार्दापर्यंत व्यापक आहे. ही गोष्ट अमेरिकेने लक्षात घेतली, तर भारताशी निष्कारण संबंध बिघडविण्याची घोडचूक तो देश करणार नाही. प्रसंगी अमेरिकेलाही सामरिक क्षेत्रात धूळ चाटविण्याची क्षमता आजचा भारत राखून आहे हे मात्र निश्चित!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा