27 C
Mumbai
Tuesday, April 14, 2026
घरविशेषउत्तर भारतातील नवं कनेक्टिव्हिटी हब: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

उत्तर भारतातील नवं कनेक्टिव्हिटी हब: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं… आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले— देशभरात झपाट्याने उभे राहणारे पायाभूत सुविधांचे प्रकल्प. सध्या आपल्या समोर एक असा भारत आहे जो केवळ विकसित देशाचे उद्दिष्ट समोर ठेवून चालत नाहीये तर आपलं लक्ष्य गाठण्यासाठी वेगाने झेप घेतो आहे.

देशात आज रस्त्यांचं जाळं विस्तारतंय… रेल्वे वेग घेत आहे… मेट्रो.. शहरांना नवं रूप देत आहे… आणि आता जागतिक दर्जाचे एअरपोर्ट्स भारताच्या क्षमतेची नवी ओळख बनत आहेत. पण हे सगळं फक्त प्रवास सुलभ करण्यापुरतं नाही—तर अर्थव्यवस्थेला नवा वेग देण्यासाठी, नव्या संधी निर्माण करण्यासाठी आहे. गेल्या काही वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेला प्राधान्यक्रम आणि त्या कामांना मिळालेली अभूतपूर्व गती—यामुळे भारताचा विकास आता केवळ कागदावर नाही, तर जमिनीवर प्रत्यक्षात दिसू लागला आहे. आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्याच बदलाचा एक दमदार पुरावा ठरतो आहे.

उत्तर भारताच्या नकाशावर उभं राहतंय एक नवं ‘कनेक्टिव्हिटी हब’… जिथे रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि हवाई मार्ग—हे सगळं एकत्र येतंय. जिथे अंतर कमी होतंय… आणि संधी जवळ येत आहेत. हे विमानतळ फक्त प्रवाशांना जोडणार नाही…
तर उद्योग, गुंतवणूक आणि भविष्याला एक नवी दिशा देणार आहे. म्हणूनच… नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे केवळ एक प्रकल्प नाही… तो आहे भारताच्या भविष्याकडे झेप घेणाऱ्या महत्त्वाकांक्षेचा एक टप्पा. याच ‘कनेक्टिव्हिटी हब’चा सखोल आढावा घेऊया.

भारताच्या वेगाने बदलणाऱ्या पायाभूत विकासाच्या प्रवासात, Noida International Airport हा एक मैलाचा दगड ठरत आहे. २८ मार्च रोजी पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते या भव्य प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आणि त्यासोबतच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. सुमारे ११,२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत उभारण्यात आलेला हा विमानतळ केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही, तर देशाच्या वाढत्या क्षमतेचा आणि दूरदृष्टीचा सशक्त नमुना आहे.

दिल्ली-NCR प्रदेशासाठी हा विमानतळ दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्यात आला आहे. सध्या बहुतांश हवाई वाहतूक हाताळणाऱ्या Indira Gandhi International Airport वर वाढत्या प्रवासी संख्येमुळे ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. जसे एखाद्या शहरात वाढत्या गर्दीमुळे नवीन रेल्वे स्थानक उभारले जाते, त्याचप्रमाणे हा विमानतळ दिल्लीच्या हवाई वाहतुकीचा भार कमी करत, प्रवास अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवेल. दोन्ही विमानतळ एकत्रितपणे काम करताना, दिल्ली-NCR मध्ये अधिक संतुलित आणि सक्षम विमान वाहतूक प्रणाली निर्माण होईल.

या प्रकल्पाच्या क्षमतेचा विचार केला तर त्याची व्याप्ती लक्षात येते. पहिल्याच टप्प्यात दरवर्षी १ कोटी २० लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही क्षमता टप्प्याटप्प्याने तब्बल ७ कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. ही केवळ आकडेवारी नसून, वाढत्या मागणीचा अचूक अंदाज घेऊन तयार करण्यात आलेली दीर्घकालीन रणनीती आहे. याशिवाय, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर दर दोन मिनिटाला एक विमान उड्डाण करेल किंवा लँड करेल, ही बाब या विमानतळाच्या कार्यक्षमतेची साक्ष देते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही हा विमानतळ अत्यंत प्रगत आहे. ३,९०० मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांना सहज हाताळण्यास सक्षम आहे. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) आणि अत्याधुनिक एअरफिल्ड लायटिंगमुळे कोणत्याही हवामानात, दिवस-रात्र २४ तास ऑपरेशन्स शक्य होणार आहेत. यामुळे उड्डाणे वेळेवर होण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा अनुभव अधिक विश्वासार्ह बनेल.

प्रवासी सेवांबरोबरच, हा विमानतळ मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही मोठी क्रांती घडवू शकतो. मल्टी-मोडल कार्गो हब आणि एकात्मिक लॉजिस्टिक्स प्रणालीच्या माध्यमातून सुरुवातीला दरवर्षी २.५ लाख मेट्रिक टन माल हाताळण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे, जी पुढील टप्प्यांमध्ये १८ लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे उत्तर भारतातील उद्योग, ई-कॉमर्स आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळेल. याशिवाय, ४० एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेली MRO (Maintenance, Repair and Overhaul) सुविधा हा या प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यामुळे विमान कंपन्यांना परदेशात न जाता भारतातच विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध होईल. परिणामी खर्चात बचत होईल, वेळ वाचेल आणि देशाच्या विमान देखभाल क्षेत्रात स्वावलंबन वाढेल.

या विमानतळाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्याची पर्यावरणपूरक रचना. ‘नेट-झिरो एमिशन’ साध्य करण्याच्या उद्देशाने ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात, यमुना द्रुतगती मार्गालगत उभारण्यात आलेला हा विमानतळ भविष्यात एक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे. रस्ते, रेल्वे आणि मेट्रो यांसारख्या विविध वाहतूक साधनांशी त्याचे एकत्रीकरण केल्यामुळे प्रवास अधिक जलद, सुलभ आणि कार्यक्षम होईल.

एकूणच पाहता, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणे हे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वाढती क्षमता, आधुनिक तंत्रज्ञान, मजबूत लॉजिस्टिक्स, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी—या सर्व घटकांचा संगम या प्रकल्पात दिसून येतो. हा केवळ एक विमानतळ नसून, भारताच्या वेगवान विकासाचा, वाढत्या आत्मविश्वासाचा आणि जागतिक स्तरावर ठाम स्थान निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेचा भक्कम पाया आहे.

२०१७ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली, तेव्हा जेवर हे एक साधं ठिकाण होतं. पण जुलैमध्ये साइट क्लिअरन्स आणि ऑक्टोबरमध्ये गृह मंत्रालयाकडून एनओसी मिळाल्यानंतर, या परिसराने विकासाच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं. जसं एखाद्या बियाण्याला योग्य माती आणि पाणी मिळालं की त्यातून मोठं झाड उगवतं, तसंच या निर्णयांनी या प्रकल्पाच्या वाढीला दिशा दिली.

२०१८ मध्ये Noida International Airport Limited ची स्थापना झाली आणि प्रकल्पाला एक मजबूत व्यवस्थापन चौकट मिळाली. हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण कोणताही मोठा प्रकल्प केवळ कल्पनेवर नाही, तर सक्षम संस्थात्मक रचनेवर उभा राहतो. त्यानंतर २०२० मध्ये Zurich Airport International AG यांची कन्सेशनायर म्हणून निवड झाली. जागतिक दर्जाचा अनुभव असलेल्या या कंपनीच्या सहभागामुळे प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाची दिशा मिळाली.

२०२१ हे वर्ष या प्रवासातील टर्निंग पॉइंट ठरलं. ऑगस्टमध्ये फायनान्शियल क्लोजर आणि मास्टर प्लॅन मंजूर झाला, आणि ऑक्टोबरमध्ये ‘अपॉइंटेड डेट’ जाहीर झाली. याचा अर्थ प्रकल्प आता केवळ कागदावर नव्हता— तो प्रत्यक्षात उतरू लागला होता. मार्च २०२२ मध्ये बांधकाम सुरू झालं आणि Tata Projects यांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती झाली. यानंतरचा काळ म्हणजे वेग, अचूकता आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीचा संगम ठरला आणि प्रकल्प उभा राहीला.

ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅलिब्रेशन फ्लाइट यशस्वी झाली— कॅलिब्रेशन फ्लाईट म्हणजे यात जमिनीवरील दिशादर्शक उपकरणे, रडार आणि एटीसी प्रणाली यांची अचूकता तपासली जाते. हा क्षण म्हणजे जणू अंतिम परीक्षेत यश मिळाल्यासारखा होता. आणि मग मार्च २०२६ मध्ये एअरोड्रोम परवाना मिळताच, या प्रकल्पाने पूर्णत्वाचा टप्पा गाठला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फेज-१ चे उद्घाटन झाले आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष उड्डाण मिळालं.

पण या प्रवासाचं महत्त्व केवळ इथपर्यंत मर्यादित नाही. या विमानतळामुळे यमुना प्राधिकरण क्षेत्रात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. जसं एखाद्या मोठ्या रेल्वे जंक्शनभोवती शहर विकसित होतं, तसंच या विमानतळाभोवती उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. लाखो रोजगार, वाढती गुंतवणूक, मजबूत लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि पर्यटन क्षेत्राला मिळणारं बळ—हे सर्व या एका प्रकल्पातून शक्य होत आहे.

Noida International Airport हा विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीसाठी उभारलेला प्रकल्प नसून, तो संपूर्ण प्रदेशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारा, विकासाचा वेग वाढवणारा आणि भारताच्या जागतिक महत्त्वाकांक्षेला बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या विमानतळाच्या उभारणीमुळे उत्तर भारतात एक नवीन आर्थिक केंद्र उदयास येत आहे. आजपर्यंत औद्योगिक आणि व्यावसायिक विकास मुख्यतः दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा या भागांपुरता मर्यादित होता. मात्र, जेवर आणि यमुना एक्सप्रेसवे परिसर आता वेगाने विकसित होणारा नवा ग्रोथ कॉरिडॉर म्हणून समोर येत आहे. जसे मुंबईच्या वाढत्या विस्तारामुळे नवी मुंबईचा विकास झाला, त्याच धर्तीवर दिल्लीच्या आसपासही एक नवीन आर्थिक भाग आकार घेत आहे. यामुळे उद्योग, आयटी पार्क, लॉजिस्टिक्स हब आणि विविध सेवा क्षेत्रांची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाचा सर्वात ठळक आणि थेट परिणाम म्हणजे रोजगारनिर्मिती— पण ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर ती संपूर्ण आर्थिक साखळीला चालना देणारी प्रक्रिया आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर लगेचच हजारो लोकांना थेट रोजगार मिळतो—एअरलाईन्स कर्मचारी, ग्राउंड स्टाफ, एअर ट्रॅफिक कंट्रोल, सुरक्षा यंत्रणा, तांत्रिक देखभाल, ग्राहक सेवा… या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होते. मात्र, या चित्राचा खरा विस्तार त्याच्या अप्रत्यक्ष परिणामांमध्ये दिसतो. एखादा विमानतळ उभा राहतो म्हणजे तो केवळ प्रवाशांना नाही, तर व्यवसाय, सेवा आणि संधींनाही आकर्षित करतो. विमानतळाभोवती हॉटेल्स उभे राहतात, रेस्टॉरंट्स आणि कॅफे सुरू होतात, टॅक्सी आणि ट्रान्सपोर्ट नेटवर्क वाढतं, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग कंपन्या आपली केंद्रे उभारतात. पर्यटकांसाठी गाईड्स, ट्रॅव्हल एजन्सीज, टूर ऑपरेटर्स यांना नवसंजीवनी मिळते.

याहूनही महत्त्वाचं म्हणजे, या सर्व क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्या केवळ उच्चशिक्षितांपुरत्या मर्यादित नसतात—तर विविध कौशल्य पातळ्यांवरील लोकांना संधी देतात. ड्रायव्हर, डिलिव्हरी कर्मचारी, हाऊसकीपिंग स्टाफ, शेफ, तांत्रिक कामगार—अशा असंख्य भूमिका निर्माण होतात. म्हणजेच, हा विकास सर्वसमावेशक ठरतो. जिथे मोठा विमानतळ उभा राहतो, तिथे केवळ इमारतींचा नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो. हळूहळू त्या परिसरात एक स्वतंत्र “मिनी-इकॉनॉमी” तयार होते—जिथे प्रत्येक नवीन व्यवसाय आणखी काही रोजगार निर्माण करतो.

लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्राच्या दृष्टीने पाहिलं, तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ही केवळ एक सुविधा नसून, तो संपूर्ण सप्लाय चेनमध्ये आमूलाग्र बदल घडवणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणासारख्या राज्यातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी दिल्लीवरील विमानतळावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागत होतं. या प्रक्रियेत वेळ, वाहतूक खर्च आणि अनिश्चितता—या तिन्ही गोष्टींचा मोठा परिणाम होत असे. आता मात्र, विमानतळ जवळ आल्याने ही संपूर्ण साखळी अधिक लहान, वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे. उद्योगांमधून तयार झालेला माल थेट काही तासांत विमानतळावर पोहोचवून निर्यात करता येईल. यामुळे “production to shipment” हा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल—जो जागतिक स्पर्धेत अत्यंत निर्णायक ठरतो.

विशेषतः कृषी क्षेत्रासाठी हा बदल गेम-चेंजर ठरू शकतो. फळं, भाजीपाला, फुलं किंवा दुग्धजन्य पदार्थ यांसारखी नाशवंत उत्पादने (perishable goods) वेळेत निर्यात होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पूर्वी लांब अंतरामुळे या उत्पादनांची गुणवत्ता कमी होण्याचा धोका असे; पण आता कोल्ड-चेन लॉजिस्टिक्स आणि जलद हवाई वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते. याशिवाय, ई-कॉमर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठीही हा विमानतळ मोठा बूस्ट ठरणार आहे. आजच्या डिजिटल युगात “फास्ट डिलिव्हरी” हीच स्पर्धेची किल्ली बनली आहे. विमानतळाजवळ वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक्स हब उभे राहिल्यामुळे कंपन्यांना आपला माल जागतिक ग्राहकांपर्यंत जलद पोहोचवणं अधिक सोपं होईल. थोडक्यात काय तर हा विमानतळ केवळ माल वाहतुकीसाठी नाही, तर “लोकल प्रॉडक्ट्सना ग्लोबल मार्केट” मिळवून देणारा एक मजबूत पूल ठरणार आहे.

या प्रकल्पाचा आणखी एक मोठा आणि दूरगामी परिणाम म्हणजे पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्याने होणारी वाढ. विमानतळाभोवती नवीन निवासी प्रकल्प, आधुनिक टाउनशिप, व्यावसायिक कॉम्प्लेक्स, आयटी पार्क आणि औद्योगिक क्षेत्रे वेगाने आकार घेणार आहेत. जागतिक आणि देशांतर्गत अनुभव पाहता, बेंगळुरू आणि हैदराबाद विमानतळांच्या आसपास जसा नियोजनबद्ध आणि वेगवान विकास झाला, त्याच धर्तीवर जेवर आणि यमुना एक्सप्रेसवे परिसर एक नवा शहरी पट्टा म्हणून उदयास येताना दिसतो. सुरुवातीला केवळ वाहतूक केंद्र म्हणून सुरू झालेल्या या भागांनी हळूहळू आयटी, बिझनेस आणि रिअल इस्टेटचे मोठे हब रूप धारण केले—आणि तसाच ट्रेंड येथेही अपेक्षित आहे. याचा थेट परिणाम म्हणजे जमीन आणि मालमत्तेच्या किमतींमध्ये वाढ. विमानतळाच्या जवळ असलेली जमीन भविष्यातील व्यावसायिक आणि निवासी मागणीमुळे अधिक मौल्यवान ठरते. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

जागतिक पातळीवर पाहता, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताला एक प्रभावी एव्हिएशन हब बनवण्याच्या दिशेने नेणारे एक अत्यंत महत्त्वाचे आणि धोरणात्मक पाऊल आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, केवळ देशांतर्गत कनेक्टिव्हिटी पुरेशी नसते— तर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांमध्ये मजबूत आणि कार्यक्षम उपस्थिती असणं तितकंच गरजेचं ठरतं.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढल्यामुळे भारतात येणाऱ्या आणि येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. हे केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे. अधिक कनेक्टिव्हिटी म्हणजे अधिक लोकांची देवाणघेवाण, अधिक व्यवसाय संधी आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक मजबूत नातं.

विशेष म्हणजे, भारताची भौगोलिक स्थिती ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. युरोप, मध्यपूर्व आणि आशिया या प्रमुख प्रदेशांच्या मधोमध असलेला भारत “ट्रान्झिट हब” बनण्यासाठी नैसर्गिकदृष्ट्या योग्य ठिकाणी आहे. मात्र, आतापर्यंत ही क्षमता पूर्णपणे वापरली गेली नव्हती. दुबई आणि सिंगापूरसारख्या शहरांनी त्यांच्या रणनीती, उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या जोरावर स्वतःला जागतिक ट्रान्झिट हब म्हणून सिद्ध केलं आहे— जिथे लाखो प्रवासी दरवर्षी केवळ ट्रान्झिटसाठी थांबतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मूल्य निर्माण होतं. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या दृष्टीने भारतासाठी गेम-चेंजर ठरू शकतो. जर योग्य नियोजन, स्पर्धात्मक एअरलाईन नेटवर्क आणि कार्यक्षम सेवा यांचा संगम साधला गेला, तर भारतही जागतिक हवाई वाहतुकीच्या नकाशावर एक महत्त्वाचं केंद्र बनू शकतो.

मल्टी- मोडल कनेक्टिव्हिटी ही या विमानतळाची सर्वात मोठी ताकद मानली जाते, आणि याच घटकामुळे हा प्रकल्प इतरांपेक्षा वेगळा ठरतो. साधारणपणे वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार—रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि हवाई सेवा—हे स्वतंत्रपणे काम करतात. पण येथे हे सर्व एकमेकांशी अखंडपणे जोडले जात आहेत, ज्यामुळे एक सुसंगत आणि कार्यक्षम “इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट नेटवर्क” तयार होत आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत आणि कार्यक्षमतेत वाढ. एखादा प्रवासी किंवा व्यवसायिक व्यक्ती घरातून निघाल्यानंतर वेगवेगळ्या वाहतूक साधनांमध्ये वेळ वाया न घालवता थेट आणि सहजपणे विमानतळापर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे, उद्योगांमध्ये तयार झालेला माल ट्रक, रेल्वे किंवा मेट्रो-आधारित लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून थेट विमानतळावर पोहोचवता येतो—तेही कमीतकमी वेळेत आणि कमी खर्चात.

हे ही वाचा:

३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करा!

‘भाजपला मतदान करू नका…’ मतदारांना धमकावणारा तृणमूलचा कार्यकर्ता अटकेत

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘हिंदू- काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान

पाकिस्तानात तेलासोबत वीज संकट; कोळशाच्या कमतरतेमुळे ३०% वीज उत्पादन धोक्या

या “seamless connectivity”मुळे व्यवसायांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होतो. पूर्वी जिथे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हा खर्चिक आणि वेळखाऊ भाग होता, तिथे आता तोच भाग अधिक वेगवान आणि विश्वासार्ह बनतो. याचा परिणाम केवळ एका उद्योगापुरता मर्यादित राहत नाही—तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे सकारात्मक पडसाद उमटतात. उद्योगांना गती मिळते, व्यापार वाढतो, निर्यात वाढते आणि त्यासोबतच रोजगारनिर्मितीही वाढते. ही एक साखळी प्रतिक्रिया असते—जिथे कनेक्टिव्हिटी सुधारली की आर्थिक क्रियाकलाप वाढतात, आणि आर्थिक क्रियाकलाप वाढले की देशाची एकूण समृद्धीही वाढते.

शेवटी इतकंच— नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ प्रवास सुलभ करणारा प्रकल्प नाही, तर उत्तर भारताला एक सक्षम आणि एकात्मिक “कनेक्टिव्हिटी हब” म्हणून घडवण्याचा टप्पा आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि हवाई मार्ग यांचा संगम घडवून, हा प्रकल्प केवळ अंतर कमी करत नाही— तर वेळ, खर्च आणि अडथळेही कमी करतो. यामुळे उद्योगांना वेग, व्यापाराला दिशा, आणि लोकांना संधी मिळते. लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम होते, निर्यात वाढते, रोजगारनिर्मितीला चालना मिळते आणि एक नवीन आर्थिक परिसंस्था आकार घेते. म्हणजेच, कनेक्टिव्हिटी सुधारते तिथेच विकासाचा वेग आपोआप वाढतो—याचं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उदाहरण आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा