राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये १० हून अधिक मुलांच्या मृत्यूस जबाबदार ठरवण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये कोणतेही दूषित पदार्थ आढळलेले नाहीत, असे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने स्पष्ट केले आहे. CDSCO मधील सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “आतापर्यंत आमच्या चाचण्यांमध्ये कोणतेही दूषित पदार्थ आढळलेले नाहीत. सिरप दूषित असल्याचे सर्व अहवाल आतापर्यंत तरी निराधार व अप्रामाणिक ठरले आहेत.”
या प्रकरणात संदिग्ध ठरवले गेलेले औषध डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड हे एक जेनेरिक कफ सिरप असून, ते सहसा सरकारी रुग्णालयांमार्फत वितरित केले जाते. औषध प्रशासनाकडून अधिक तपशीलवार चाचण्या सुरू असून, अंतिम अहवालानंतरच निष्कर्ष निश्चित केला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सूचित केले.
वादग्रस्त कफ सिरप जयपूरस्थित केसन्स कंपनीने बनवले आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत, या कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपचे ४० हून अधिक नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले असल्याचे नोंदवले गेले आहे. ही आकडेवारी औषध प्रशासन व अन्य तपास यंत्रणांसाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.
गेल्या दोन आठवड्यात राजस्थानमध्ये भरतपूर आणि सिकरमध्ये झालेल्या दोन मुलांचा मृत्यू आणि आजाराच्या अनेक घटनांशी या औषधाचा संबंध आढळल्यानंतर ते चाचणीसाठी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, भरतपूरमधील एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टराने ते औषध सुरक्षित असल्याचे सिद्ध करण्यासाठी स्वतःच कफ सिरपचे सेवन केले होते. मात्र, काही वेळातच त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम झाल्याचे निदर्शनास आले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शेजारील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरपचे सेवन केल्यानंतर नऊ मुलांचे मूत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर मानले जात असून स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील राज्य औषध निरीक्षकांकडून स्वतंत्र तपास सुरू असून, सध्या नमुने विविध प्रयोगशाळांमध्ये परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. अंतिम अहवाल आल्यानंतरच औषधाच्या गुणवत्ता आणि संभाव्य दूषिततेबाबत स्पष्ट निष्कर्ष काढता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा :
“भूगोलात स्थान हवे असेल तर राज्य-पुरस्कृत दहशतवाद थांबवा”
प्रिय मित्र मोदींना भेटण्यासाठी उत्सुक; भारत दौऱ्याबद्दल पुतिन काय म्हणाले?
बीएलएने सात पाकिस्तानी सैनिकांना केले ठार; इतर शस्त्रे सोडून पळाले!
ऑपरेशन सिंदूर: एफ- १६, जेएफ- १७ विमानांसह पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली!
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील जवळपास ५०० नागरिकांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या असून, कोणत्याही संसर्गजन्य आजाराची उपस्थिती आढळून आलेली नाही. सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही चाचणी प्रक्रिया राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) मागील आठवड्यात हाती घेतली होती. या अंतर्गत पाणी, कीटकशास्त्र (entomology) आणि औषधांचे नमुने यांचेही सखोल विश्लेषण करण्यात आले.







