28.6 C
Mumbai
Sunday, August 2, 2026
घरविशेषकोकण रेल्वेचे तिकीट नाही...तीन गाड्या, चाकरमानी वाऱ्यावर; बेलापूरमध्ये उपोषण

कोकण रेल्वेचे तिकीट नाही…तीन गाड्या, चाकरमानी वाऱ्यावर; बेलापूरमध्ये उपोषण

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईकडून घोषणा

Google News Follow

Related

कोकण रेल्वेवरील वाढत्या प्रवासी समस्यांबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबईने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयासमोर १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा समितीने केली आहे. महाराष्ट्राने कोकण रेल्वे प्रकल्पात सर्वाधिक २२ टक्के आर्थिक योगदान दिले असतानाही राज्याच्या वाट्याला केवळ मोजक्याच प्रवासी गाड्या आल्याचा आरोप समितीने केला आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ दिवा–सावंतवाडी पॅसेंजर, दिवा–रत्नागिरी पॅसेंजर आणि तुतारी एक्स्प्रेस या तीनच गाड्या मिळाल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात जात असले, तरी त्यांना कन्फर्म रेल्वे तिकीट मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येसह मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या विविध मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे.

प्रवासी संघटनेने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा सुसज्ज टर्मिनस म्हणून विकास करणे, वसई–सावंतवाडी आणि कल्याण–सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे, मुंबई–रत्नागिरी इंटरसिटी, दादर–चिपळूण मेमू आणि पुणे–रत्नागिरी एक्स्प्रेस सुरू करणे, कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करणे, भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेचे विलीनीकरण करणे, पनवेल–मिरज मार्गे मडगावकडे सुपरफास्ट एक्स्प्रेस वळविणे, तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकावर छप्पर उभारणे अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

समितीच्या मते, गेल्या २५ वर्षांत कोकण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यानुसार रेल्वे गाड्यांची संख्या वाढलेली नाही. मागील १२ वर्षांपासून रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यास वसई, कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर आणि पुणे येथून कोकणासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करता येतील, असा दावा संघटनेने केला आहे.

याशिवाय, पंजाब, दिल्ली आणि हरियाणामधून केरळकडे धावणाऱ्या मेल व एक्स्प्रेस गाड्या पुणे–मिरज मार्गे कोकण रेल्वेवर वळविण्यात याव्यात, अथवा ते शक्य नसल्यास कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या रेल्वे स्थानकावर त्यांना आलटून-पालटून थांबा देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे आणि सचिव यशवंत जडयार यांनी दिली. कोकण रेल्वेचा प्रकल्प उभा करण्यासाठी आम्ही जमिनी दिल्या आणि आज आम्हालाच शेळ्या मेंख्यासारखा प्रवास करावा लागतोय, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये जैशच्या संशयित दहशतवाद्याला अटक

ममतांच्या काळातील जमीन लीज व्यवहारांची होणार छाननी

मुंबई उच्च न्यायालयातील कँटीनला ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस

पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर हिमस्खलन; चार गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले

यावेळी यशवंत जडयार म्हणाले की, कोकण रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी कोकणातील नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या. भविष्यात मुंबई-कोकण प्रवास जलद आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही कोकणातील प्रवाशांना पुरेशा रेल्वे सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कोकणवासीयांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा