पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा केली होती. ७ मे रोजी मध्यरात्री सुरू झालेले हे ‘ऑपरेशन सिंदूर’ दोन्ही देशांनी युद्धबंदी जाहीर केल्यानंतर थांबवण्यात आले. मात्र, याच दरम्यान भारतीय हवाई दलाच्या एका पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय हवाई दलाने पोस्टकरत ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या ९ दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईनंतर, भारत-पाकिस्तान तणाव आणखी वाढला, पाकिस्तानने सलग चार रात्री क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले आणि गोळीबार करत भारतीय नागरिक आणि गावांना टार्गेट केले. पाकच्या या हल्ल्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले.
शनिवारी (९ मे) संध्याकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी युद्धबंदीची घोषणा केली, त्यानंतर अवघ्या ३ तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. या विश्वासघाताला लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. तथापि, परराष्ट्र सचिवांची यानंतरच्या शेवटच्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदी सुरू ठेवली आणि तणाव आणखी वाढवू नये यावर सहमती दर्शवली. या प्रमाणे ‘ऑपरेशन सिंदूर’ संपल्याचे सर्वत्र घोषित झाले.
हे ही वाचा :
बांगलादेश: शेख हसीनांच्या अवामी लीगवर बंदी!
‘भारताने ९० मिनिटांत ११ एअरबेस उद्ध्वस्त केले’
‘भारत-पाकिस्तान युद्धामुळे विनाश होऊ शकला असता’
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! शस्त्रसंधी तीन तासात मोडली, भारतीय लष्कराला अधिकार
दरम्यान, रविवारी (११ मे) भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत हँडलवरून एका ट्विटमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवाई दलाने ट्विटरवर लिहिले की, “भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने, सविस्तर माहिती वेळेत दिली जाईल. भारतीय हवाई दल सर्वांना अटकळ आणि खोट्या माहितीचा प्रसार टाळण्याचे आवाहन करते.”







