“युद्धाचे नियोजन करताना, नेमके युद्ध केंव्हा थांबवायचे, हा एक महत्त्वाचा निर्णय असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून, त्यांचे तळ उध्वस्त करून त्यांचे मोठे नूकसान करणे, हे आपले उद्दिष्ट होते आणि हे उद्दिष्ट आपण साध्य केले होते. या व्यतिरिक्त भारताने केलेल्या हल्ल्यात नूरखान हवाई तळावर असलेल्या पाकिस्तानी अणुबॉंबच्या साठ्याचे नुकसान झाले आणि तेथून अणूकिरणोत्सर्गाची गळती सुरू झाली. अणूयुद्धाचा धोका वाढू नये यासाठी आपण वेळेवर युद्ध थांबवण्याचे हे सुद्धा एक कारण होते.
खरे तर चीनला वाटत होते की, भारत पाकिस्तान युद्ध खूप दिवस चालेल आणि जसे रशिया -युक्रेन आणि इस्राएल- हमास युद्धात अडकले, तसेच भारतही या युद्धात फसेल. ज्यामुळे भारताची आर्थिक प्रगती खुंटून जाईल. अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या संघर्ष समाप्तीसाठी योग्य वेळी अचूक निर्णय घेतल्याबद्धल आपण आपल्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक करायला हवे”, असे प्रतिपादन ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केले.
हेही वाचा..
भाजपाने मणिपूरच्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली
तेलंगणामध्ये पंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू
सीबीआयीकडून ४ परदेशी नागरिकांसह १७ आरोपी आणि ५८ कंपन्यांविरोधात आरोपपत्र
जम्मू-काश्मीरमध्ये तापमानात घसरण
ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी लिहिलेल्या ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तान, चीनबरोबर भारतीयांचे दीर्घकालीन युद्ध ( बदलता भारत- संयमातून सडेतोड उत्तराकडे) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. सावरकर विचार मंच, नवी मुंबई तर्फे शुक्रवारी दि. १२ डिसेंबर रोजी वाशी येथील गुजरात भवन सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.
पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, सावरकर विचार मंचचे अध्यक्ष संतोष कानडे, प्रकाश मोरे, अजय वाळुंज व्यासपीठावर उपस्थित होते. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा ऑपरेशन सिंदूर बद्धलचे विश्लेषण आपल्या व्याख्यानातून केले.बहुआयामी युद्धनीती, सायबर, माहिती आणि अंतराळ युद्ध, सिंधू पाणी कराराचा फेरविचार, आत्मनिर्भर भारताचे शस्त्रसामर्थ्य आणि भविष्यातील धोके या विषयीची माहिती त्यांनी उपस्थित श्रोत्यांना करून दिली. सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी संजीव नाईक, मंजिरी मराठे यांनी हेमंत महाजन यांच्या पुस्तक प्रकाशनास आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.







