एशेज मालिकेचा दुसरा टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू होत आहे. आणि या महत्त्वाच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळतोय — कर्णधार पॅट कमिन्सच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
**‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’**च्या अहवालानुसार, दुसऱ्या टेस्टसाठी जाहीर होणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात पॅट कमिन्सचे नाव निश्चित असेल. सप्टेंबरमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्स खूप काळ क्रिकेटबाहेर होते. अनेकांना वाटत होतं की ते एशेजमधील पाचही टेस्ट गमावतील. पण कमिन्सने जोमाने पुनर्वसन करून फिटनेस परत मिळवली आहे.
कमिन्सच्या परतीमुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी आणि खालच्या क्रमाची फलंदाजी दोन्ही अधिक मजबुत होणार आहेत. ते परतले, तर कर्णधारपदही त्यांच्याकडे परत जाईल आणि स्टीव्ह स्मिथची जबाबदारी कमी होईल.
कमिन्स प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले तर ब्रेंडन डॉजेटला बाहेर बसावे लागू शकते.
डॉजेटने क्रिकेट.com.au ला सांगितलं:
“कमिन्सची प्रकृती सुधारतेय. ते पुनरागमन करू शकले नाहीत तरीही मी मानसिकदृष्ट्या तयार आहे. सध्या आम्ही विजयाचा आनंद घेत आहोत. रविवारपर्यंत ब्रिस्बेनला पोहोचू.”
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्टमध्ये डॉजेटने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. मिचेल स्टार्कच्या वादळात त्यांचे योगदान जरी झाकले गेले असले, तरी पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ३ अशी एकूण ५ विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या.







