भारताच्या पहिल्या खासगी विकसित ऑर्बिटल-श्रेणीच्या ‘विक्रम-१’ रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्कायरूट एरोस्पेसचे सहसंस्थापक पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.
या यशाला भारताच्या अंतराळ प्रवासातील ऐतिहासिक टप्पा संबोधत पंतप्रधानांनी हे यश देशाच्या अंतराळ क्षेत्राला नवी दिशा देणारे आणि तरुण पिढीला नवकल्पनांसाठी प्रेरित करणारे असल्याचे सांगितले.
“तुम्ही अंतराळात नवे झाड लावले, तरुणांसाठी प्रेरणेची मुळेही रुजवली” स्कायरूटच्या संस्थापकांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका, तुम्ही केवळ अंतराळात नवे झाड लावले नाही, तर नव्या पिढीला प्रेरणा देणारी मुळेही जमिनीवर अधिक मजबूत केली आहेत.”
पंतप्रधानांनी सांगितले की, ते या मोहिमेवर सातत्याने लक्ष ठेवून होते आणि प्रत्यक्ष प्रक्षेपणावेळी टीमसोबत उपस्थित राहण्याची त्यांची इच्छा होती. “मला या तरुण टीमसोबत उपस्थित राहायचे होते. मी संपूर्ण प्रक्षेपणावर बारकाईने लक्ष ठेवले. तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष आनंदाची बाब म्हणजे तुमच्या टीममधील बहुतांश सदस्य २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत.”
हे ही वाचा:
मोदींच्या आवाहनालाही छेद! सोन्याचे दर घसरताच खरेदी पुन्हा वाढली
‘विक्रम-1’ झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व
रोजच्या या सवयी ठरत आहेत कोलेस्टेरॉल वाढीचे कारण
श्रीकृष्णाला चोरण्याचा प्रयत्न !
खासगी अंतराळ क्षेत्रावरील विश्वास सार्थ ठरला
मोदी यांनी सांगितले की, भारताच्या अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांना संधी देण्याच्या निर्णयावर सुरुवातीला अनेकांनी शंका व्यक्त केली होती. मात्र ‘विक्रम-१’च्या यशामुळे केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले, असे त्यांनी नमूद केले.
‘वंदे मातरम्’चा संदेशही गेला अंतराळात
विक्रम-१ या मोहिमेतील सर्वात विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्ताक्षरात लिहिलेल्या “वंदे मातरम्” या संदेशाचे पोस्टकार्डही या मोहिमेद्वारे अंतराळात पाठविण्यात आले. या पोस्टकार्डसोबत स्कायरूट एरोस्पेसचे कर्मचारी, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि जगभरातील शुभेच्छुकांनी लिहिलेली अनेक हस्तलिखित पोस्टकार्डही पाठविण्यात आली. याशिवाय सध्याचे आणि माजी इस्रो अध्यक्ष तसेच भारतीय अंतराळवीरांनी लिहिलेले संदेशही या मोहिमेचा भाग होते.
पंतप्रधानांची ‘एक्स’वरील प्रतिक्रिया
यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत लिहिले, “स्कायरूट एरोस्पेसच्या टीमशी संवाद साधून विक्रम-1च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे.”
ते पुढे म्हणाले, “खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नव्या संधी निर्माण करत असून नवकल्पनांना वेग देत आहे. हे यश देशातील असंख्य तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि निर्भयपणे नवकल्पना करण्याची प्रेरणा देईल.”
‘मिशन आगमन’ने रचला इतिहास
स्कायरूट एरोस्पेसने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘मिशन आगमन’ अंतर्गत विक्रम-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. उड्डाणापूर्वी तांत्रिक कारणामुळे काही काळ विलंब झाला असला तरी त्यानंतर संपूर्ण मोहिम यशस्वीपणे पार पडली. रॉकेटच्या सर्व चार टप्प्यांनी अपेक्षेप्रमाणे काम करत उपग्रह यशस्वीरित्या निर्धारित कक्षेत सोडले.
भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी
या यशामुळे स्वतः डिझाइन, निर्मिती आणि प्रक्षेपण केलेले ऑर्बिटल-श्रेणीचे रॉकेट विकसित करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे, तसेच भारताच्या व्यावसायिक अंतराळ क्षेत्रासाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे.
