पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून) जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी देशातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचे, अंजी पुलाचेही उद्घाटन केले. यासोबतच पंतप्रधान मोदींनी कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे देखील उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी चिनाब पुलाची पाहणी केली आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. यासोबतच त्यांनी कामगारांचीही भेट घेतली.
चिनाब पूल हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा एक भाग आहे, जो भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आहे. चिनाब नदीवर हा पूल १,३१५ मीटर लांब आहे आणि नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंच आहे. ही उंची दिल्लीतील कुतुबमिनारच्या ५ पट आणि पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा जास्त आहे. या पुलाची मुख्य कमान ४६७ मीटर लांब आहे आणि २८,००० मेट्रिक टन स्टीलपासून बनलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाच्या बांधकामाचा खर्च सुमारे १५०० कोटी रुपये आहे.
चिनाब पुलाच्या बांधकामात एका अनोख्या केबल क्रेन सिस्टीमचा वापर करण्यात आला, जो भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आला. २६६ किमी/ताशी वेगाने येणारे वारे आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा पूल डिझाइन करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
अभिनेता दिनो मोरियाच्या घरावर ईडीची धाड!
दिल्ली: बकरी ईदला गायी आणि उंटांच्या कुर्बानीवर बंदी!
तेव्हाच महाराष्ट्र हित जपता आलं नसतं का?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, चिनाब नदीवर बांधलेला १ किमी पेक्षा जास्त लांबीचा रेल्वे पूल सुमारे ३५९ मीटर उंचीचा आहे, जो आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. त्यांनी सांगितले की हा पूल ताशी २६० किमी वेगाने वारा आणि भूकंप झोन-V सहन करू शकतो. त्याच्या बांधकामात सुमारे २७००० मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे. त्याची लांबी १३१५ मीटर आहे. ऑगस्ट २००४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. दरम्यान, चिनाब पूल सुरू झाल्यामुळे, कटरा ते श्रीनगर दरम्यानचा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास वेळ फक्त ३ तासांवर येईल, जो सध्या ५-६ तासांचा आहे. यासोबतच, काश्मीर रेल्वे मार्गाने देशाच्या इतर भागांशी जोडला जाईल.







