गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील तरुणांचा एक गट वाढत्या प्रदूषण आणि विषारी हवेविरुद्ध निषेध करत आहे. अशातच रविवारी इंडिया गेटजवळ काही तरुण पुन्हा एकदा प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवत असताना त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच निदर्शकांनी दाखवलेले पोस्टर्सही वादग्रस्त ठरले आहेत.
प्रदूषणाविरुद्ध कारवाईची मागणी करत सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत असताना, तरुण-तरुणींनी अचानक “नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा जिंदाबाद” असे नारे देण्यास सुरुवात केली. याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. तसेच निदर्शकांनी गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशात पोलिस चकमकीत मारला गेलेला माओवादी कमांडर माडवी हिडमा याचे पोस्टर आंदोलनावेळी दाखवले. निदर्शकांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याने आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर मिरचीचा फवारणी केल्याने तणाव वाढला, ज्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आणि निदर्शकांनी असे पोस्टर्स का दिसले याची व्यापक चौकशी करण्यात येत आहे.
दिल्लीतील हवेची पातळी सतत खालावत चालली आहे. गेल्या आठवड्यापासून इंडिया गेटभोवती हातात फलक घेऊन अनेक तरुण घोषणाबाजी करताना दिसले. ते केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करत आहेत की, हे विषारी प्रदूषण कमी करावे आणि दिल्ली स्वच्छ राहावी. या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले असून या आंदोलनादरम्यान, निदर्शक ‘माओवादी कमांडर माडवी हिडमा अमर रहे’च्या घोषणा देऊ लागले. अनेक जण कॉम्रेड हिडमा अमर रहे आणि लाल सलाम- लाल सलाम अशा घोषणाही देत होते.
हे ही वाचा:
केएल राहुल वनडेसाठी कर्णधार, जडेजा–ऋतुराजचे पुनरागमन
अस्लम शेखवर गुन्हा दाखल करा! मालवणीत संताप
पायलट नमांश स्याल यांच्या सर्वोच्च बलिदानाला देश कधीच विसरणार नाही
पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद
निदर्शने आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत १५ ते २० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. निदर्शकांवर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करताना, दिल्ली विकास मंत्री कपिल मिश्रा यांनी “अशा विचारसरणीला योग्य उत्तर” असे म्हटले. “दिल्लीत काल झालेल्या निषेधाकडे पहा: प्रदूषणाच्या नावाखाली हातात पोस्टर्स, ओठांवर लाल सलामचे नारे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून उभे असलेले जिहादी आणि नक्षलवाद्यांचा नवा चेहरा,” असे त्यांनी सोमवारी ट्विट केले.







