22 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरविशेषमुत्सद्देगिरी, धर्मनिष्ठता यांचे प्रतिक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

मुत्सद्देगिरी, धर्मनिष्ठता यांचे प्रतिक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवींचा समावेशक आणि लोकशाहीप्रधान दृष्टिकोन

Google News Follow

Related

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धर्म, राजकारण, प्रशासन आणि समाज यांना एकत्र बांधणाऱ्या दूरदृष्टीच्या नेत्या होत्या. १८व्या शतकातील अस्थिरतेच्या काळात त्यांनी धार्मिक अधिष्ठानावर आधारित एकात्म भारताची संकल्पना कृतीत उतरवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, समाजातील सर्व थरांचा समावेश, मुत्सद्देगिरीचे धोरण, आणि गुप्त राजनयाच्या माध्यमातून त्यांनी माळव्यात शांतता व समृद्धी प्रस्थापित केली. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २३०वी पुण्यतिथी आहे. धर्मनिष्ठा, सामाजिक समरसता, स्त्री-सन्मान, आर्थिक न्याय, मुत्सद्देगिरी, पर्यावरणपूरक दृष्टी, आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून केलेले शासन ही त्यांची ओळख…
अहिल्यादेवी होळकर (१७२५–१७९५) या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांतातील होळकर घराण्याच्या शासक होत्या. त्यांनी १७६७ ते १७९५ या कालावधीत सुमारे २८ वर्षे राज्य केले. त्यांचा कारभार शांतता, समृद्धी आणि सामाजिक समरसतेचा आदर्श मानला जातो. त्यांनी विविध मुत्सद्देगिरीच्या तंत्रांचा वापर करून आपले राज्य मजबूत केले.
हे ही वाचा:
जनता नाकारते म्हणून राहुल गांधी मतदार यादीवर प्रश्न निर्माण करतात
डाउन सिंड्रोमने प्रभावित महिलांमध्ये अल्झायमरचा धोका
दक्षिण कोरियाच्या किम कोन यांची चौकशी सुरु
प्रधानमंत्री जन धन योजनेने देशात निर्माण केला प्रभाव
१. अहिल्यादेवी होळकर यांची धार्मिक मुत्सद्देगिरी
अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेतले की, प्रजापालक, धर्मनिष्ठ, आणि तत्त्वज्ञानी राणीचा आदर्श डोळ्यासमोर येतो. परंतु त्यांचे धार्मिक कार्य केवळ भक्तीभावापोटी नव्हते; त्यामागे एक सुदृढ राजकीय मुत्सद्देगिरी होती. भारतात १८व्या शतकातील राजकीय अस्थैर्य, अफगाण आक्रमण, मुघल साम्राज्याची पडझड आणि इंग्रजांची वाढती घुसखोरी चालू असताना अहिल्यादेवी यांनी धर्मस्थळांच्या पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून समाजात एकत्वाची भावना निर्माण केली आणि आपले नेतृत्व धार्मिक अधिष्ठानावर अधोरेखित केले.
भारतभर पसरलेले मंदिर पुनर्निर्माण कार्य
अहिल्याबाईंनी केवळ महेश्वर किंवा मध्य भारतापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या हिंदू तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिरांचे जीर्णोद्धार केले. यामध्ये प्रमुख नावं म्हणजे –

१. काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी (१७८० मध्ये शिखर आणि सभामंडपाची पुनर्बांधणी)
२. सोमनाथ मंदिर, गुजरात
३. त्र्यंबकेश्वर, नाशिक
४. रामेश्वरम, तामिळनाडू
५. गंगोत्री, उत्तराखंड
६. जगन्नाथपुरी, ओडिशा
७. बद्रीनाथ व केदारनाथ मंदिरांचे घाट आणि प्रवेशद्वार

या कामातून त्यांनी “भारताचे धार्मिक आणि सांस्कृतिक एकत्व” जपण्याचा प्रयत्न केला. विविध भौगोलिक क्षेत्रांतील श्रद्धास्थळांवर निधी खर्च करून त्यांनी मराठा राज्याचा व्यापक प्रभाव प्रस्थापित केला. काशी विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी स्वतः काशीमध्ये वास्तव्य करून मंदिर बांधणीची देखरेख केली. हे कार्य मुघलांनंतर त्या भागातील हिंदूंमध्ये आत्मविश्वास जागवणारे ठरले.
धर्म आणि प्रशासन यांचा समन्वय
त्यांनी धार्मिक संस्था, मठ, आखाडे, संत व साधू यांच्या प्रबळ सल्ल्याने निर्णय घेण्याची परंपरा प्रस्थापित केली. धर्म हा केवळ आस्था नव्हता, तर समाजशासनाचा भाग होता. त्यांनी धार्मिक पंडित आणि ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार पंचांगावर आधारित सार्वजनिक धोरणे राबवली.

त्यांनी अशा गावी शासकीय धान्य व जलस्रोत निर्माण केले जेथे वार्षिक यात्रा होत असत, जसे की उज्जैनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी व्यवस्था.

मूर्तींचे स्थलांतर आणि संरक्षण
औरंगजेबाच्या काळात अनेक देवळांवर हल्ले झाले, मूर्ती फोडण्यात आल्या. अहिल्याबाईंनी अशा मूर्ती शोधून त्यांचे पुनःस्थापन केले. त्या मूर्ती केवळ आस्थेचे प्रतीक नव्हत्या, तर त्या धर्म आणि स्वत्वाची ओळख होती. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांनी मूळ शिवलिंगाचे पुनःप्रतिष्ठापन केले, जे हिंदू गौरवाचा प्रतीक मानले गेले.
उपेक्षित देवस्थाने आणि सामाजिक समावेश

अहिल्यादेवी यांनी केवळ मुख्य तीर्थक्षेत्रांपुरते मर्यादित न राहता, दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील देवस्थानेही बांधली. त्यांनी दलित आणि आदिवासी समाजासाठीही मंदिर उभारणी केली, जिथे सर्व जातींना प्रवेश होता. गोंड समाजासाठी मध्य भारतात ‘शिवमठ’ उभारले गेले जेथे समाजशिक्षण, वैद्यकीय सेवा व प्रसादाची सोय केली गेली.

स्थापत्य व स्थापत्यशास्त्रातील योगदान

अहिल्यादेवींनी बांधलेली मंदिरे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना होती. त्यांच्या मंदिर बांधणीच्या धाटणीमध्ये उत्तर भारतातील नागर शैली आणि दख्खनातील मराठा शैली यांचा संगम दिसतो. महेश्वरातील अहिल्येश्वर मंदिर हे स्थापत्यशास्त्र व शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानले जाते.

धार्मिक सत्तेच्या माध्यमातून राजकीय स्वायत्तता
अहिल्यादेवी या राजघराण्याशी संबंधित असल्या तरी त्यांनी धर्माचा वापर कधीही सत्तेसाठी केला नाही. किंबहुना त्यांची प्रखर धार्मिक प्रेरणा त्यांना सत्ता राबविण्यासाठी मार्गदर्शक ठरली. धर्म हा केवळ अध्यात्माचा विषय नसून त्याचा वापर राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठीही झाला. बहुतेक वेळेस दिल्लीच्या किंवा इंग्रजांच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांनी आपल्या राज्यात कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये निर्णय घेतले, जे त्यांची राजकीय स्वायत्तता सिद्ध करतात.

अहिल्यादेवी होळकर यांची धार्मिक मुत्सद्देगिरी ही एक कुशल धोरणात्मक योजना होती. त्या धर्मनिष्ठ होत्या हे खरेच, पण त्यांचा धर्म हा राजकारण, समाजव्यवस्था आणि संस्कृती यांना एकत्र बांधणारा आधारस्तंभ होता. त्यांनी धार्मिकतेच्या माध्यमातून एकात्म भारताची संकल्पना कृतीत उतरवली आणि आपले राज्य ‘धर्मावर आधारित परंतु सर्वसमावेशक’ या तत्त्वावर उभे केले. १८व्या शतकातील कोणत्याही राजकारण्याचा तुलनात्मक अभ्यास केला तर अहिल्यादेवींचे धार्मिक मुत्सद्देगिरी हे एकमेव उदाहरण ठरते जेथे धर्म, संस्कृती, समाज आणि प्रशासन यांचा अभूतपूर्व संगम साधला गेला.

२. अहिल्यादेवी होळकर यांचे सैनिकी धोरण आणि मुत्सद्देगिरीचे प्रयोग

अहिल्यादेवी होळकर यांनी १८व्या शतकात माळवा प्रांताच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थैर्यासाठी विविध लष्करी-सामरिक धोरणे अवलंबली. त्यांच्या मुत्सद्देगिरीतून त्यांनी अंतर्गत बंडखोरी दडपली, परकीय आक्रमणांना तोंड दिले आणि मराठा महासंघातील प्रमुख घराण्यांशी युती करून राज्याची सीमारेषा मजबूत केली. खालीलप्रमाणे त्यांच्या लष्करी-सामरिक धोरणांचा आढावा घेता येईल:
तुकोजीराव होळकर यांची सेनापतीपदी नियुक्ती
अहिल्यादेवी यांनी आपल्या सासऱ्याचे दत्तक पुत्र तुकोजीराव होळकर यांना होळकर सैन्याचे सेनापती म्हणून नियुक्त केले. त्यांनी २८ वर्षे अहिल्याबाईंच्या सैन्याचे नेतृत्व केले आणि राज्याच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
फ्रेंच सैनिकी सल्लागारांची नेमणूक
१७९२ मध्ये अहिल्यादेवी यांनी फ्रेंच सैनिकी सल्लागार शेव्हलियर ड्युड्रनेक यांना नियुक्त करून आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार बटालियन तयार करण्यात आल्या.
अंतर्गत बंडखोरी दडपण्यासाठी मुत्सद्देगिरी
मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर गंगाधर राव या दिवाणाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. त्याने रघुनाथ राव यांना होळकर राज्यावर आक्रमण करण्यास प्रवृत्त केले. अहिल्यादेवी यांनी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्याकडून मदत मागवली आणि आपल्या महिला सैन्याच्या तयारीची धमकी देऊन शत्रूला परतवले.
महादजी शिंदे यांच्याशी युती
महादजी शिंदे यांनी अहिल्याबाईंच्या राज्यकर्तृत्वाला मान्यता दिली आणि त्यांच्या राज्याच्या सुरक्षेसाठी पाठिंबा दिला. या युतीमुळे माळवा प्रांतात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित झाली.
रघुनाथ राव यांच्याशी मुत्सद्देगिरी
रघुनाथ राव यांच्या आक्रमणाच्या प्रयत्नाला अहिल्यादेवी यांनी मुत्सद्देगिरीने तोंड दिले. त्यांनी शत्रूला चेतावणी देणारे पत्र पाठवले आणि आपल्या महिला सैन्याच्या तयारीची माहिती दिली, ज्यामुळे रघुनाथ राव परतले. अहिल्यादेवी होळकर यांच्या लष्करी-सामरिक धोरणांमुळे माळवा प्रांतात स्थैर्य, सुरक्षितता आणि विकास साधता आला. त्यांच्या मुत्सद्देगिरीचा अभ्यास आजही प्रशासकीय आणि लष्करी क्षेत्रात मार्गदर्शक ठरतो.
३. अहिल्यादेवीच्या राजकीय संतुलनाचा मागोवा
अहिल्यादेवी होळकर यांची  “सत्ता संतुलन मुत्सद्देगिरी” ही त्यांच्या राजकीय दूरदृष्टीची एक महत्त्वाची बाब होती. त्यांनी विविध स्थानिक व बाह्य शक्तींच्या दरम्यान संतुलन साधत आपल्या राज्याच्या स्वायत्ततेचे आणि शांततेचे संरक्षण केले. खाली याचे तपशीलवार विश्लेषण देत आहोत:

पेशव्यांशी संतुलित संबंध राखणे

अहिल्याबाईंच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्याच्या राजधानीत (पुणे) पेशव्यांचे वर्चस्व होते. होळकर हे मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे सरदार घराणे असूनसुद्धा, अहिल्यादेवीनी पेशव्यांशी टक्कर देण्याऐवजी त्यांच्याशी कुशलपणे सौहार्दपूर्ण आणि संतुलित संबंध राखले.
होळकर, सिंधिया आणि भोसले या तीन घराण्यांमधील राजकीय समतोल

१७८०–१७९० च्या दशकात मराठा संघटनेतील (confederacy) घराणी परस्परांत स्पर्धा करत होती. अहिल्यादेवी ंनी या संघर्षात उघडपणे कुठल्याही गटात सामील होण्याऐवजी, तटस्थ भूमिका स्वीकारली.

पानिपत युद्धानंतर मराठा संघटना पुन्हा उभारण्याचे प्रयत्न होत असताना, त्यांनी आपले सैन्य योग्य वेळी पाठवले, मात्र उगाच आक्रमक भुमिका घेतली नाही.
इंग्रजांशी दूर लांब ठेवलेले संबंध
अहिल्यादेवीच्या काळात इंग्रजांनी भारतात आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. पण त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी कोणतीही प्रत्यक्ष संधी किंवा संघर्षाचा मार्ग निवडला नाही. अहिल्याबाईंनी आपले राज्य व्यापारासाठी खुले ठेवले, पण कोणत्याही राजकीय किंवा लष्करी संधीसाठी इंग्रजांशी संधान केले नाही.

 माळव्यात ब्रिटिश हस्तक्षेपाची शक्यता कमी झाली आणि होळकरांचे स्वायत्त अस्तित्व टिकून राहिले.

स्थानिक सरदारांशी सामंजस्य

माळवा प्रदेशात अनेक जमाती आणि सरदार होते जसे भिल्ल, गोंड, पाटील, देशमुख इ. या स्थानिक सरदारांशी त्यांनी केवळ लष्करी कारवाई केली नाही, तर त्यांना व्यवस्थापनात सामावून घेतले. भिल्ल समाजाला सीमेवर रक्षणाची जबाबदारी देणे हे फक्त लष्करी धोरण नव्हते, तर त्यांना आपले मान्यतेचे स्थान देणारे संतुलनकारी मुत्सद्देगिरीचे उदाहरण होते.

४. गुप्तहेरांचे तंत्र आणि अनौपचारिक कूटनीती
अहिल्यादेवी होळकर यांच्या मुत्सद्देगिरीत गुप्तहेर व्यवस्था आणि अनौपचारिक राजनय यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी आणि राजकीय स्थैर्यासाठी या साधनांचा कुशलतेने वापर केला.
गुप्तहेर व्यवस्था
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात एक सशक्त गुप्तहेर जाळे उभारले होते. या जाळ्याच्या माध्यमातून त्यांना शत्रूंच्या हालचालींची माहिती मिळत असे. त्यांच्या गुप्तहेरांनी रघुनाथरावांच्या सैन्याच्या शिप्रा नदीकाठी छावणीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे अहिल्यादेवी यांनी महादजी शिंदे आणि दामाजी गायकवाड यांना मदतीसाठी पत्रे पाठवली आणि तुकोजीराव होळकर यांच्या मदतीने सैन्य गोळा केले. अहिल्यादेवी स्वतः रणांगणात गेल्या आणि रघुनाथरावांचा सामना केला, ज्यामुळे रघुनाथराव माघार घेतला.
अनौपचारिक राजनिति
अहिल्यादेवीनी औपचारिकआणि अनौपचारिक राजनीतीचा वापर करून आपल्या राज्याच्या हितासाठी विविध राजकीय नेत्यांशी संबंध प्रस्थापित केले. त्यांनी महादजी शिंदे, दामाजी गायकवाड आणि नागपूरचे भोसले यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. त्यांनी आपल्या राज्याच्या हितासाठी या नेत्यांशी पत्रव्यवहार केला आणि त्यांच्या मदतीने राज्याच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या गुप्तहेर व्यवस्था आणि अनौपचारिक राजनयाच्या धोरणांमुळे त्यांच्या राज्यात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित झाले. त्यांच्या मुत्सद्देगिरीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

५. वैवाहिक मुत्सद्देगिरीचा अभाव

राजकीय व कुटुंबीय युतींसाठी विवाह ही एक पारंपरिक मुत्सद्देगिरीची पद्धत होती. विशेषतः राजपुत शासकांनी आपली कन्या मुघल सम्राटांशी विवाहबद्ध करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारच्या वैवाहिक मुत्सद्देगिरीतून संघर्ष टाळणे, निष्ठा सुरक्षित करणे, आणि सत्तास्थैर्य प्रस्थापित करणे हे उद्दिष्ट असायचे.
मात्र, याच्या पूर्णतः विरोधी दृष्टीकोन अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत दिसतो. त्यांनी वैवाहिक मुत्सद्देगिरीचा वापर सत्ता टिकवण्यासाठी किंवा राजकीय हेतूने केला नाही. उलटपक्षी, त्यांनी त्यांच्या कन्येचे लग्न यशवंतराव फणसे या एका सामान्य कुटुंबातील, परंतु कर्तबगार व चारित्र्यसंपन्न तरुणाशी लावले. हा विवाह कुठल्याही राजकीय गठजोडीऐवजी, मुलीच्या इच्छेचा आणि व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर लावण्यात आला.
या विवाहातून अहिल्यादेवींचा समावेशक आणि लोकशाहीप्रधान दृष्टिकोन दिसून येतो. त्यांच्या दृष्टिकोनात स्त्री-पुरुष समानता, सामाजिक समरसता, आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांना मान्यता होती. त्यामुळे त्यांच्या राजवटीत इतर प्रकारची मुत्सद्देगिरी, जसे की धार्मिक सौहार्द, सामाजिक सुधारणा, अर्थव्यवस्थेचा संतुलित विकास, आणि लष्करी सजगता महत्त्वाची होती, परंतु वैवाहिक मुत्सद्देगिरी मात्र त्यांनी प्रथेप्रमाणे स्वीकारलेली नव्हती.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा