मुंबई मेट्रो रेड लाईन (लाईन ७) वरील गुंदवली ते अंधेरी पश्चिम या मार्गावर बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा जवळपास तासभर खोळंबली. यामुळे शेकडो प्रवासी अडकले आणि प्रवासात मोठा व्यत्यय आला. मिळालेल्या माहितीनुसार, गुंदवली स्थानकावरून निघालेल्या तीन मेट्रो गाड्यांना गोरेगाव स्थानकावरूनच माघारी पाठवण्यात आले. गोरेगाव मेट्रो स्थानकावर बराच वेळ मेट्रो गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला.
अनेक प्रवाशांनी उशीर झाल्याने ऑफिस, शाळा आणि महत्त्वाच्या कामांत अडथळा आल्याच्या तक्रारी केल्या. “दर आठवड्याला कधी न कधी मेट्रो बंद पडतेच. वेळेवर पोहोचायचं मुश्किल होतंय. इतकी प्रगत सेवा म्हणवणाऱ्या व्यवस्थेची ही अवस्था का?”, असा एका प्रवाशाने सवाल उपस्थित केला.
मुंबई मेट्रोच्या कर्मचारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नल यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड सतत घडत आहे, आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
हे ही वाचा :
काँग्रेस पक्ष म्हणजे बुडणारे जहाज!
दिल्लीतील संस्थेत १७ मुलींशी अश्लील वर्तन; संचालक चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर गुन्हा
संयुक्त राष्ट्र महासभा: इंडोनेशियाच्या अध्यक्षांकडून भाषणाचा समारोप “ओम शांती, शांती ओम”ने
नेपाळ हिंसाचारात माजी पंतप्रधानांच्या पत्नी गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी भारतात हलवले!
दरम्यान, मुंबई मेट्रो ही मुंबई महानगर क्षेत्रातील एक अत्याधुनिक जलद वाहतूक सेवा आहे. ती शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे आणि नागरिकांना एक सुरक्षित, जलद व पर्यावरणपूरक पर्याय देणे यासाठी तयार करण्यात आली आहे. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो ठप्प झाली तर त्या मार्गावरील लाखो प्रवाशांना त्यांचा फटका बसतो.







