रस्ते जलमय, रेल्वे सेवा विस्कळीत; मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा

पावसामुळे शहराची गती मंदावली

रस्ते जलमय, रेल्वे सेवा विस्कळीत; मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा

नैऋत्य मोसमी पावसाने अखेर दमदार हजेरी लावताच मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाला आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.

मंगळवारी रात्री ८.३० ते बुधवारी पहाटे ५.३० या नऊ तासांच्या कालावधीत मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली. राम मंदिर, कुलाबा आणि सांताक्रूझ या तीन प्रमुख केंद्रांवर २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामध्ये राम मंदिर परिसरात सर्वाधिक २२४ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे २१८.५ मिमी तर सांताक्रूझ येथे २१०.६ मिमी पाऊस झाला. याशिवाय सायन, विक्रोळी, विद्याविहार, टाटा पॉवर-चेंबूर, बायकुला, वांद्रे आणि जुहू विमानतळ परिसरात ११५ ते २०४ मिमी दरम्यान अतिवृष्टी झाली.

यंदा मान्सून मुंबईत नेहमीच्या तारखेपेक्षा तब्बल १३ दिवस उशिरा दाखल झाला. मात्र आगमन होताच त्याने दमदार सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी शहराच्या पायाभूत सुविधांची परीक्षा पुन्हा एकदा लागली आहे.

विक्रोळीत भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे विक्रोळी पश्चिम येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत असलेल्या सन सिटी कॉम्प्लेक्सजवळ एका निवासी इमारतीला लागून असलेली भिंत कोसळली. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

झाड कोसळून गाडीचे मोठे नुकसान

शहरातील दुसऱ्या एका भागात मुसळधार पावसामुळे एक मोठे झाड कारवर कोसळले. या दुर्घटनेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहनातील चालक जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दल आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटवण्याचे काम हाती घेतले.

ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम

मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला. तुर्भे आणि कोपरखैराणे स्थानकांदरम्यान पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने ट्रॅक खचल्याची घटना घडली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ठाणे-वाशी विभागातील अप लाईन पहाटे ५.०६ वाजता आणि डाउन लाईन सकाळी ५.५० वाजता असुरक्षित घोषित करण्यात आली. परिणामी सकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक गाड्या उशिराने धावल्या आणि स्थानकांवर मोठी गर्दी झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. सकाळी ७.२७ वाजता अप लाईन १० किमी प्रतितास वेगमर्यादेसह सुरू करण्यात आली, तर डाउन लाईन सकाळी ७.३५ वाजता सुरक्षित घोषित करून गाड्यांना ३० किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते, पाण्याच्या अतिरिक्त प्रवाहामुळे रेल्वेमार्गाचे नुकसान झाले.

अंधेरी, हिंदमाता, दादरमध्ये पाणी साचले

रात्रीच्या मुसळधार पावसानंतर अंधेरी सबवे, मालाड सबवे, हिंदमाता, दादर, सायनमधील गांधी मार्केट यांसारख्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र सकाळपर्यंत परिस्थितीत सुधारणा झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ठिकाणांवरील पाणी ओसरले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. रेल्वे आणि बेस्ट बस सेवाही सामान्यपणे सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

युक्रेनमध्ये भारतीय सैनिक? ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळला

इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!

उत्तर प्रदेशात १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील; खान सरांचे सेंटरही बंद

बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीविरुद्धचा १०० कोटींचा खटला जिंकला

महापालिकेची यंत्रणा सतर्क

पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन बीएमसीची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल, तसेच विविध विभागांची पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत. बोरिवलीसह विविध भागांमध्ये कर्मचारी गटारे आणि जलनिस्सारण वाहिन्या साफ करताना दिसून आले. पाणी साचण्याच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील २४ तास मुंबई आणि उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले असून नागरिकांना हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version