भाजपा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टिका करणारे उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांना गेल्या काही निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर आता उपरती झाली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘सामना’ या शिवसेना उबाठाच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी विरोधकांच्या चुका आणि सत्ताधाऱ्यांची शक्तीस्थळे दाखविली आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने ‘बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक सरळ विकत घेतले. निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही. भाजपने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व ‘तालेवार’ लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले. त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत.” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या निवडणूक कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
संजय राऊत लिहितात की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. मोदी, शहा, फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले हे खरे. तरी त्यांचेही लोक मोठया प्रमाणात पराभूत झाले व सुनीता चव्हाण यांच्यासारखे साधे उमेदवार आजही लोक निवडून देतात.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हटले आहे की, फडणवीस स्वतः निवडणुकीत उतरले. भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरले. पक्षाचा कार्यक्रम राबवला. निवडणूक लढवणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटेजी’ ठरवतात. त्यासाठी त्यांनी पैशांचं बळ वापरलं असा मुद्दा राऊतांनी मांडला. तर या निवडणुकीत शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत १६२ जागा मिळाल्या. रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतले, याकडे राऊतांनी लक्ष वेधले.
त्यांनी असेही म्हटले आहे की, फडणवीस विरोधकांच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेत आहेत. भाजपा राज्यात, केंद्रात सत्तेवर असला तरी सगळ्या निवडणुका लढवतोय. जे राजकारणात आहेत आणि राजकारण हे सत्ता मिळविण्यासाठीच करायचे आहे हे ज्यांना माहीत आहे, त्यांना निवडणूक युद्धासारखी लढावी लागेल. जिल्हा परिषदेत भाजपा २२५ जागा जिंकतो, राष्ट्रवादी अजित पवार १६५ तर शिंदेंची शिवसेना १६२ जागा जिंकतो हे फक्त सत्ता आणि पैशामुळे होत नाही. अन्यथा, तमाशा कलावंत असलेल्या सुनीता चव्हाण यांच्यासारख्या अत्यंत साधी राहणी असलेल्या उमेदवाराला विजय मिळवता आला नसता.
हे ही वाचा:
भारत ऊर्जा खरेदीचा निर्णय राजकीय दबावाला बळी पडून घेत नाही!
‘टीव्हीएस’ ‘बजाज’ दुचाकी बाजारातील ‘हिरो’
मायक्रोसॉफ्टच्या व्यवसाय पद्धतींची अमेरिकेत चौकशी सुरू
काँग्रेसचे सपकाळ म्हणतात, शिवाजी महाराज-टिपू सुलतान हे समकक्ष!
संजय राऊत यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कान टोचले. ते म्हणाले की, शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला. पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने १६५ जागा जिंकल्या हे विसरून चालणार नाही याकडे राऊतांनी मोठे भाष्य केले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या शिवसेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी लिहिले आहे की, शिवसेनेची पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असे मत राऊतांनी यावेळी मांडले.







