डोंबिवलीत शेखर आणि सीमा विचारे यांचा सुपुत्र शार्दुल हा दोन दिवसांपूर्वी संपूर्ण देशात चर्चेचा विषय होता. कारण होते, त्याने सीए फाऊंडेशन परीक्षेत मिळविलेले दणदणीत यश. या परिक्षेत मुळात लागणारा निकाल अत्यंत कमी असतो. कठीण परीक्षा म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. मात्र शार्दुलने आपल्या हुशारी, मेहनत आणि कष्टाच्या बळावर देशात तिसरा क्रमांक पटकाविण्याचा पराक्रम केला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
या परीक्षेसाठी देशभरातून ८४ हजार मुले बसली होती. परिक्षेचा निकाल लागला १५.०९ टक्के. त्यात शार्दुलने हे यश मिळविल्याने सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी शार्दुलला फोन करून त्याचे अभिनंदन करत त्याने मिळविलेल्या यशाची सकाळीच माहिती दिली. शार्दुलला अर्थातच धक्का बसला, मात्र आपण या परीक्षेत चांगले यश मिळवू असा त्याला विश्वास होता. संध्याकाळी त्याला निकाल कळला आणि घरात एकच आनंदाचे वातावरण तयार झाले.

शार्दुलचे वडील शेखर म्हणाले की, त्याने ११पासूनच सीए या क्षेत्रातच कारकीर्द करण्याचा विचार केला होता. तशी तयारी त्याची तेव्हापासूनच सुरू होती. १०वीच्या परीक्षेत दमदार यश मिळविल्यानंतर त्याने आयआयटी करावे, नीटची परीक्षा द्यावी असे अनेक पर्याय त्याला सांगितले जाऊ लागले पण त्याने कॉमर्स करत सीए होण्याचा निश्चय केला होता. त्या दिशेने हे पहिले यशस्वी पाऊल पडले आहे.
हे ही वाचा:
एकाच कुटुंबातील तिघा चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
IREDA बाँडमध्ये गुंतवणुकीवर मिळणार कर सवलत
महिलांचे गुपचूप व्हिडीओ रेकॉर्डिंग !
शार्दुलने प्रामाणिकपणे मेहनत घेतल्यामुळे त्याला हे यश मिळाले. त्याने या काळात कुठेही बाहेर न जाता अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. अर्थात, त्याने आपले छंद, आवडनिवडही जोपासली पण अभ्यासावरील त्याची एकाग्रता ढळू दिली नाही. त्याला या यशात आध्यात्मिक आधारही मिळाला. शार्दुलची बहीण शर्वरी हीदेखील गुणवत्तावान आहे. ती सध्या अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या अंतर्गत एका प्रकल्पावर काम करत आहे.







