मॅंचेस्टरमध्ये भारतीय संघाने दिलेली झुंजार कामगिरी पाहून माजी कर्णधार सौरव गांगुली खुश आहेत. त्यांना वाटतं की, जर गोलंदाजीमध्ये थोडा सुधार झाला, तर भारत केनिंग्टन ओव्हलवर होणारा पाचवा कसोटी सामना जिंकू शकतो.
भारताने चौथी कसोटी बरोबरीत राखली, मात्र त्याआधीच्या लंडन कसोटीत केवळ २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
गांगुली म्हणाले, “ही एक युवा टीम आहे. त्यांना वेळ द्या. भारताने पाचव्या दिवशी जशी फलंदाजी केली, त्यावरून असं वाटतं की लॉर्ड्सची हार खूप चटका देणारी ठरली असेल. रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम खेळी केली. भारतीय क्रिकेटसाठी ही सकारात्मक गोष्ट आहे.”
गांगुलींच्या मते, के.एल. राहुल, शुभमन गिल, जडेजा, सुंदर आणि ऋषभ पंत यांचे प्रदर्शन संपूर्ण मालिकेत उल्लेखनीय राहिले आहे. “मॅंचेस्टरच्या पाचव्या दिवशी भारताने जो आत्मविश्वास दाखवला, तो वाखाणण्याजोगा आहे,” असं त्यांनी म्हटलं.
त्यांनी हेही सांगितलं की भारत पाचवा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवू शकतो. “हे खेळाडू तरुण आहेत, त्यांच्या कारकिर्दीची ही सुरुवात आहे. इंग्लंडमधील हे प्रदर्शन त्यांना पुढे खूप उपयोगी पडेल. गोलंदाजीत थोडासा सुधार झाला, तर ओव्हलवर आपण विजय मिळवू शकतो.”
गांगुलींनी खास करून ऋषभ पंतचं कौतुक केलं, ज्याने दुखापत असूनही मैदानावर येऊन अर्धशतक पूर्ण केलं. “पंत कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत दर्जेदार खेळाडू आहे. सध्या तो दुखापतीत आहे, पण त्याचं या मालिकेतील फलंदाजीचं योगदान फार मोठं आहे.”
त्यांनी कुलदीप यादवला संधी देण्याचाही सल्ला दिला. “माझं गंभीरला सांगणं आहे, ओव्हलमध्ये कुलदीप यादवला खेळवा. योग्य बॉलिंग आक्रमण निवडा. फलंदाज जर असंच खेळत राहिले, तर भारत हा सामना नक्कीच जिंकेल.”







