पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आखाती देशांमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या मदतीसाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ने संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना समन्वित मदत आणि रिअल- टाइम सहाय्य देण्यासाठी विशेष कंट्रोल रूम स्थापन केली आहे. मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, हा कंट्रोल रूम दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यरत असेल.
मंत्रालयाने जाहीर केलेले हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत:
1800118797 (टोल-फ्री), +91 11 2301 2113, +91 11 2301 4104 आणि +91 11 2301 7905.
याशिवाय, संबंधित प्रदेशातील भारतीय दूतावास आणि मिशन्सचे आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. यात बहरीन, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवैत, लेबनॉन, ओमान, कतार, रमल्ला, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे, जेणेकरून अडचणीत सापडलेल्या भारतीयांना तातडीने मदत मिळू शकेल.
बुधवारी (४ मार्च) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले. प्रवक्ते जैस्वाल यांनी तणाव कमी करण्यासाठी नवी दिल्ली सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी अधोरेखित केले की, खाडी प्रदेशात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे काम करतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा आणि कल्याण ही भारत सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. “या प्रदेशावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या घडामोडींमुळे भारत अलिप्त राहू शकत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. जैस्वाल यांनी इशारा दिला की पश्चिम आशियातून महत्त्वाचे व्यापारी मार्ग आणि ऊर्जा पुरवठा साखळ्या जातात. त्यामुळे कोणताही मोठा व्यत्यय भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो.
हे ही वाचा:
राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले! चार नावे जाहीर
कतारमध्ये इराणच्या १० गुप्तहेरांच्या आवळल्या मुसक्या
एकाच पत्त्यावर २२ बनावट पासपोर्ट! मास्टरमाइंडसह दोघांना अटक
होळीच्या दिवशी मुंबई पोलिसांचा ‘खाक्या’; १६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई
परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारत व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. अलीकडील सागरी घटनांमध्ये काही भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडल्याची किंवा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. संघर्ष केवळ तीव्रच झाला नसून तो इतर देशांपर्यंतही पसरला आहे, ज्यामुळे अनेक भागांतील दैनंदिन जीवन आणि आर्थिक हालचाली बाधित झाल्या आहेत.
यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी इराण आणि खाडी प्रदेशात शत्रुत्व सुरू झाल्यानंतरही भारताने सर्व पक्षांनी संयम बाळगावा आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले होते. मंत्रालयाने स्पष्ट केले की संबंधित देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास भारतीय समुदाय व संघटनांशी सातत्याने संपर्कात असून, नियमित सल्लामसलत करत आहेत आणि अडकलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहेत.







