आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाने यंदा (२०२५मध्ये) आपली सेवा देत आर्थिक व्यवस्थापनाचा एक नवा आदर्श निर्माण केला. वीस हजारांपेक्षा जास्त विशेष फेऱ्यांमधून नऊ लाखांहून अधिक भाविकांचे सुस्थितीत परिवहन करत, जवळपास ३६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ मानत महामंडळाने गाव ते पंढरपूर थेट बससेवा, आगाऊ आरक्षण, तिकीट बुकिंगची सुलभ व्यवस्था आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भाविकांचा प्रवास अधिक सुलभ केला. वारकरी चळवळ केवळ श्रद्धेचा विषय नसून ती राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी संधी आहे, हे यामुळे पुन्हा सिद्ध झाले. सामाजिक सहभाग, कार्यक्षम नियोजन आणि महसूलवाढ या बाबींमुळे ही वारी यशस्वी झाली.
आषाढी वारी: श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची यशोगाथा
महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली आषाढी वारी यंदा एका नव्या रूपात अनुभवायला मिळाली — श्रद्धेच्या पलीकडे जाऊन ती सुशासन, सेवाभाव आणि आर्थिक फायद्याचं प्रतीक ठरली. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालताना त्यांच्या मागे राज्य सरकारचा सुजाण पाठिंबा होता – केवळ वाहतुकीपुरता नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थापनाच्या पातळीवर.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटीने) यंदा ऐतिहासिक कामगिरी केली. ५ हजारांहून अधिक अतिरिक्त बसेस, २१ हजारांहून अधिक विशेष फेऱ्या, ९ लाखांहून अधिक प्रवासी – आणि हे सगळं सुरक्षित, वेळेत आणि अत्यंत कौशल्याने पार पाडलं. एकूण ३३.५ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवत एसटीने वारीतून अर्थव्यवस्थेलाही गती दिली.
या यशामागे होता एक स्पष्ट दृष्टीकोन – “गाव ते पंढरपूर थेट सेवा”, ज्यात एकत्रित नोंदणी असलेल्या भाविकांसाठी त्यांच्या गावातूनच थेट विठुरायाच्या दारात नेणारी सेवा दिली गेली. यामुळे खासगी बससेवेची आवश्यकता कमी झाली आणि एसटीला शंभर टक्के ‘आसनभराव’ मिळाला.
डिजिटल टिकीट प्रणाली, क्यूआर कोडे (QR code) आणि युपीआय (UPI) मुळे बस प्रवास झपाट्याने व सुटसुटीत झाला. कॅशलेस व्यवहारामुळे तिकीट देण्याची प्रक्रिया सुलभ झाली आणि वेळेची बचत झाली, फेऱ्यांची संख्या वाढली आणि अधिक प्रवाशांना सेवा देता आली. सुरक्षा आणि वाहतूक नियोजनासाठी चेकपोस्ट, तांत्रिक कर्मचारी, आणि विशेष नियंत्रण यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या. .
पंढरपूरमध्ये उभारण्यात आलेली तात्पुरती चार बसस्थानके – चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आय टी आय / कॉलेज), आणि विठ्ठल कारखाना – मार्गांची फेररचना आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय हे वारीच्या व्यवस्थापनाचे प्रमुख आधार होते. यामध्ये पोलीस, होमगार्ड, पालिका आणि स्वयंसेवी संस्था सर्वजण एकत्र आले.
वारीच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार आणि एसटीने विशेष काळजी घेतली होती. वारीसाठी नेमण्यात आलेल्या सर्व बसगाड्यांची आधीच तपासणी, देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली. कुठेही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मार्गावर आणि पंढरपूरमध्ये अतिरिक्त तांत्रिक कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे बससेवा सुरळीत आणि अखंड सुरू राहिली.
राज्य सरकारच्या “निर्मल वारी, हरित वारी” उपक्रमांतर्गत स्वच्छता, प्लास्टिक मुक्त वारी आणि पर्यावरणपूरक उपाय राबवले गेले. ही वारी श्रद्धेच्या पलीकडची होती – ती सामाजिक बांधिलकी, कुशल नियोजन आणि जनहित केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नेतृत्वाची यशस्वी कथा ठरली.
हे ही वाचा:
कॅमेरूनचा ‘कॅमेरा ऑन’… आणि विंडीज ऑफ!
छोट्या गावातून आला स्विंगचा जादूगार
सिरीज कोणाच्या नावावर? आज रंगणार भारत-इंग्लंड महिला महासंग्राम!
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी!
एसटीने कसे केले नियोजन?
आषाढी यात्रेसाठी एसटीने राज्याच्या सहा प्रमुख विभागांतून विशेष बससेवेचं नियोजन केलं होतं – मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगरहून १२००, पुणे १२००, नाशिक १०००, अमरावती ७००, मुंबई ५०० आणि नागपूरहून १०० बसगाड्या सोडण्यात आल्या. वाखरीतील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणातील गर्दी नियंत्रणात ठेवता आली.
महिला प्रवाशांची संख्या वाढली
महिलांना मिळालेल्या ५०% भाडे सवलतीचा मोठा फायदा झाला. यंदा जवळपास ३० टक्क्यांनी महिला प्रवासी संख्या वाढली, आणि यामुळे महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षी ६.३५ लाख प्रवाशांनी एसटीचा लाभ घेतला होता, तर यंदा ही संख्या तब्बल २.७७ लाखांनी वाढली.
सांगली विभाग
सांगली विभागातील विविध आगारांतून पंढरपूरकडे ४०० विशेष बस सोडण्यात आल्या. या माध्यमातून ८०.८४ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं – गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ४.४० लाखांची वाढ. वय वर्षे ७५ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सेवा आणि महिलांसाठी ५० टक्के सवलतीमुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास दृढ झाला, आणि यात्रेच्या यशात सांगली विभागाने मोठा वाटा उचलला.
| आगार | सोडलेल्या बसेस | मिळालेले उत्पन्न (₹ लाखात) |
|---|---|---|
| सांगली | ५० | ८४.३८ |
| मिरज | ४७ | ७८.७० |
| इस्लामपूर | ४३ | ९६.५२ |
| तासगाव | ६० | ९९.९१ |
| विटा | २६ | ५३.७४ |
| जत | २४ | ५०.९३ |
| आटपाडी | ४७ | १३२.८० |
| कवठेमहांकाळ | ३२ | ५६.२१ |
| शिराळा | ३८ | ७३.१८ |
| पलूस | ३१ | ८१.७९ |
कोल्हापूर विभागाची ऐतिहासिक कामगिरी
२ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत कोल्हापूर विभागातील विविध आगारांमधून आषाढी वारीसाठी सोडण्यात आलेल्या विशेष बसेसनी उल्लेखनीय कामगिरी केली. अवघ्या आठ दिवसांत या बसेसनी एकूण २,१९,८२१ किलोमीटरचा प्रवास केला आणि विभागाने तब्बल १ कोटी ९२ लाख १ हजार ७३ रुपयांचा महसूल मिळवला.
आषाढी वारीतील एसटी महामंडळाची तीन वर्षांची प्रगती
आषाढी वारीसारख्या भव्य आणि श्रद्धेच्या सोहळ्यात एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांत आपली सेवा अधिक व्यापक, आधुनिक आणि परिणामकारक बनवत एक नवा टप्पा गाठला आहे.
२०२३:
या वर्षी एसटीने सुमारे ४,६०० विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या. १७,१०० फेऱ्यांमधून ८.७२ लाख प्रवासी पंढरपूरपर्यंत पोहोचले. या सेवेतून २३.४५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड ठरला.
२०२४:
यंदा बसगाड्यांची संख्या ५,००० वर गेली. १९,१८६ फेऱ्यांतून ९.५३ लाख प्रवाशांची वाहतूक झाली. महसूल २८.९१ कोटी रुपयांवर पोहोचला. याच वर्षी डिजिटल तिकिट प्रणालीचा अंशतः प्रारंभ झाला. “गाव ते पंढरपूर थेट सेवा”, “फास्ट ट्रॅक वारी”, तसेच तात्पुरते आगार या उपक्रमांनी सेवा अधिक सोयीस्कर बनवली.
२०२५:
हे वर्ष व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणखी एक पायरी उंचावणारे ठरले. ५,२०० अतिरिक्त बसगाड्यांतून २१,४९९ फेऱ्या पार पडल्या. यामध्ये ९.७२ लाख प्रवाशांनी प्रवास केला. ३५.८७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, यावर्षी सर्व फेऱ्यांमध्ये पूर्णपणे डिजिटल तिकिटिंग प्रणाली लागू करण्यात आली. या तीन वर्षांत एसटी महामंडळाने केवळ महसूलात ५० टक्क्यांहून अधिक वाढ केली नाही, तर सेवा कार्यक्षमतेत, तांत्रिक सुधारणा, आणि ग्रामीण भागाशी जोडलेली जवळीक यामध्येही मोठी प्रगती केली. या यशामागे व्यवस्थापन कौशल्य, मनुष्यबळाचे अचूक नियोजन आणि वारीच्या सामाजिक‑भावनिक संदर्भांची जाण या सगळ्यांचा समन्वय आहे. “सेवा हेच आमचं ध्येय” या ब्रीदवाक्याला न्याय देत, एसटी महामंडळाने आषाढी वारीच्या व्यवस्थापनात स्वतःला एक विश्वासार्ह आणि प्रगत संस्थान म्हणून सिद्ध केलं आहे.







