भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले की, सुनील गावस्कर आजच्या काळात खेळत असते, तर ते टी-२० फॉरमॅटमधीलही सर्वोत्तम फलंदाज ठरले असते.
कपिल देव म्हणाले,
“सुनील गावस्कर जर या युगात खेळत असते, तर ते टी-२० मधीलही अव्वल फलंदाज झाले असते. ज्याचा बचाव (डिफेन्स) मजबूत असतो, त्याच्यासाठी मोठे फटके मारणे कठीण नसते. मोठे फटके मारणे सोपे असते, पण बचाव करणे कठीण असते. ज्यांचा बचाव मजबूत असतो, त्यांच्याकडे अतिरिक्त वेळ असतो. त्यामुळेच ते प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करू शकतात.”
क्रिकेटमधील आवडत्या भूमिकेबाबत बोलताना कपिल देव म्हणाले की, त्यांना केवळ क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळतो. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी—दोन्हीच त्यांना आवडतात.
“तुम्ही जडेजाकडे पाहा, तो क्षेत्ररक्षणाचा आनंद घेतो. मला क्रिकेटमधील प्रत्येक गोष्ट आवडते,” असे ते म्हणाले.
तरुण खेळाडूंविषयी मत व्यक्त करताना माजी कर्णधार म्हणाले,
“प्रतिभावान लोक बोलतात, बुद्धिमान लोक ऐकतात. आपल्याला ऐकण्याची सवय लावली पाहिजे. नवे लोक नव्या विचारांसह येत आहेत. त्यांना मोकळ्या मनाने ऐकले पाहिजे. जर आपल्यात ऐकण्याची सवय नसती, तर कदाचित आज जग जिथे आहे, तिथे पोहोचले नसते. तरुण खूप प्रतिभावान आहेत आणि अनेक बाबतीत आमच्यापेक्षा चांगले आहेत. मात्र अनुभव आमच्याकडे आहे आणि तो कोणीही आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे तरुणांचे खुले दिलाने स्वागत केले पाहिजे.”
या कार्यक्रमाला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज देखील उपस्थित होत्या. सामन्यादरम्यान पुस्तक वाचण्याच्या सवयीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यामुळे आजूबाजूला काय घडते आहे, कोणता फलंदाज कसा बाद होतो, हे लक्षात येत नाही आणि मानसिक दडपणही कमी होते.
“पुस्तक वाचणे ही चांगली सवय आहे,” असे त्या म्हणाल्या.
आपल्या कर्णधारपदाच्या काळाची आठवण सांगताना मिताली राज म्हणाल्या,
“मी कधीही मैदानावर किंवा ड्रेसिंग रूममध्ये संयम गमावला नाही. कोणताही मुद्दा असेल, तर त्यावर संघाच्या बैठकीत चर्चा व्हायची.”
मिताली राज या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्वाधिक यशस्वी फलंदाज आणि कर्णधार राहिल्या आहेत.







