सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना
एकीकडे करोनाच्या वाढत्या संसर्गात लोकांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होणे कठीण होत चाललेले असताना आणि त्यासोबतच ऑक्सिजनचा, औषधांचा तुटवडा भासत असताना ठाण्यातील भव्य जम्बो कोविड सेंटर मात्र धूळ खात पडले आहे. नियोजनाच्या अभावी आणि निर्णयक्षमतेतील विलंब यामुळे हे सेंटर वापराविना पडून आहे. या दिरंगाईमुळे जनसामान्यांमध्ये संताप आहे. इथे असलेली अद्ययावत सामग्री, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आणि इतर सर्व सोयीसुविधा गेल्या अनेक दिवसांपासून तयार करून ठेवले आहेत. मात्र त्यांचा वापर होत नाही.
जवळपास १००० बेड्सची व्यवस्था असलेल्या या सेंटरमध्ये सगळ्या सुविधा या वापराविनाच पडून आहेत. ठाण्यात आणि त्याच्या आसपासच्या भागात रुग्णांची वाढती संख्या पाहता तिथे असलेल्या हॉस्पिटल्स आता कमी पडू लागलेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे सेंटर उभारण्याचे काम सुरू होते, पण अजूनही ते सेंटर पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सज्ज झालेले नाही. ऑक्सिजनचे बेड्सही तिथे आहेत, पण ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण क्षमतेने होणार नाही, असा दावा करत ते सेंटर सुरू करण्यात चालढकल करण्यात आली आहे.
ही सुविधा तर उभारली पण त्यासाठी जर ऑक्सिजनचा पूर्ण पुरवठा होऊ शकला नाही तर रुग्णांना तिथे दाखल तरी कसे करणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र कित्येक दिवसांपासून हे कोविड सेंटर उभे केले जात असताना या समस्येचा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस आदिंचीही नियुक्ती इथे झालेली नाही.
हे ही वाचा:
आमदारकीसाठी फोन, कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पत्र
नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड सेंटर
सतत खोटारडी टीका केल्यावर फोन कोणत्या तोंडाने करायचा?
करोनाचा संसर्ग सुरू होऊन आता दीड वर्षांचा काळ लोटला आहे. पण अजूनही आपल्याकडे अशी कोविड सेंटर्स ही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. कारण त्यांचे नियोजन नेमके कसे करायचे याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली ही सेंटर्स अशीच धूळ खात पडली आहेत. करोनाचा संसर्ग थोडा कमी झालेला असताना ही सेंटर्स परिपू्र्ण होतील याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आता अचानक संसर्ग वाढल्यानंतर ही सेंटर्स उपलब्ध होणे शक्य नाही.







