दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा बहुचर्चित चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ अखेर ५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. महिनोंपासून या चित्रपटाबाबत अनेक वाद रंगले होते, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा कमी राहिली. ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेड अहवालानुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे १.७५ कोटी रुपये कमावले. तर विवेक अग्निहोत्री यांचा यापूर्वीचा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ने पहिल्या दिवशीच ३.५ कोटींहून अधिकची ओपनिंग घेतली होती आणि पुढे झपाट्याने वाढत २५० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला होता.
‘द काश्मीर फाइल्स’च्या तुलनेत ‘द बंगाल फाइल्स’*ची सुरुवात बरीच मंदावलेली दिसली. या चित्रपटाची कथा १९४६ मधील ‘डायरेक्ट ॲक्शन डे’ म्हणजेच कलकत्ता दंगलीवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर ‘द बंगाल फाइल्सला टक्कर देत टायगर श्रॉफचा ‘बागी ४ ’ही रिलीज झाला आहे. या चित्रपटातून टायगर लोकप्रिय फ्रँचायझीत पुनरागमन करत आहे.
हेही वाचा..
ट्रम्प म्हणाले पंतप्रधान मोदी महान
सायबर पोलिसांनी दोन ठगांना पकडले
काँग्रेस बिहारच्या लोकांकडे हीन नजरेने पाहते
तुरुंगात खासदार इंजिनिअर रशीदवर ट्रान्सजेंडर कैद्यांचा हल्ला!
‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, ‘बागी ४’ने पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात करत सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली. त्याच्या तुलनेत ‘द बंगाल फाइल्स’चा आकडा खूपच कमी राहिला आहे. मात्र, विकेंडमध्ये कमाईत वाढ होईल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. ‘द बंगाल फाइल्स’मध्ये मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, सिमरत कौर, अनुपम खेर, दर्शन कुमार, सास्वत चॅटर्जी आणि नामाशी चक्रवर्ती यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाची कथा दोन पातळ्यांवर चालते. एका बाजूला वर्तमानकाळात, जिथे सीबीआय अधिकारी शिव पंडित (दर्शन कुमार) याला पश्चिम बंगालमध्ये एका मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तपासासाठी पाठवले जाते. तर दुसऱ्या बाजूला कथा जाते स्वातंत्र्यपूर्व आणि भारताच्या फाळणीपूर्व काळात, जी भारती (सिमरत कौर) या पात्राभोवती गुंफलेली आहे.







