इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज होत असून, या मालिकेतील सर्वाधिक लक्ष भारताच्या गोलंदाजी आघाडीवर केंद्रित आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज २० जूनपासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या मालिकेत चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.
भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचे मत आहे की, ही मालिका सिराजसाठी स्वतःला अधिक प्रभावी सिद्ध करण्याची आणि बुमराहसोबत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहण्याची मोठी संधी आहे. त्यांच्या मते, ही मालिका गोलंदाजांनी जिंकून देण्याची शक्यता अधिक आहे.
२०१८ आणि २०२१ च्या इंग्लंड दौऱ्यांचा प्रभाव
भरत अरुण यांनी स्पष्ट केलं की २०१८ मधील दौऱ्यात भारत जरी सामना जिंकू शकला नाही, तरी तो अनुभव पुढील कामगिरीसाठी फारच उपयुक्त ठरला. २०२१ मध्ये भारताने इंग्लंडमध्ये आघाडी घेतली होती. त्यांनी सांगितले, “गोलंदाज अनुभवी होते आणि त्यांनी परिस्थिती लवकर समजून घेतली. यामुळेच त्यांना यश मिळाले.”
सिराजसाठी निर्णायक क्षण
सिराजबाबत बोलताना अरुण म्हणाले, “सिराजने २०२१ मधील दौऱ्यातून खूप काही शिकले आहे. त्याने स्वतःच्या चुका सुधारल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याची लय जबरदस्त होती. त्यामुळे इंग्लंड दौरा त्याच्यासाठी बुमराहसह आघाडीचा गोलंदाज होण्याची योग्य वेळ आहे.”
नवोदित गोलंदाजांबाबत मत
प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांच्याबद्दल विचारले असता अरुण म्हणाले, “सध्या अर्शदीप थोडा पुढे आहे. डावखुरा गोलंदाज असल्यामुळे आणि चेंडू दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता असल्यामुळे तो इंग्लंडसाठी फायदेशीर ठरू शकतो.”
काउंटी क्रिकेटचा अनुभव महत्त्वाचा
अर्शदीपने केंट संघाकडून काउंटी क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या परिस्थितीचा त्याला अनुभव आहे. अरुण म्हणाले, “फक्त चेंडू फिरतोय म्हणून विकेट मिळतील, असं नाही. त्या परिस्थितीनुसार स्वतःला ढालणं महत्त्वाचं आहे.”
ड्यूक्स चेंडूचा प्रभाव आणि इंग्लंडमधील हवामान
“ड्यूक्स चेंडू हा सध्या जगातील सर्वात उपयुक्त चेंडूंपैकी एक आहे. पण त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं नाही. हवामान आणि स्थानिक परिस्थिती सतत बदलत असल्याने वेगवेगळ्या लेंथचा अंदाज घेणं ही मोठी कसोटी असते,” असं भरत अरुण यांनी शेवटी सांगितलं.







