महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ सुरू केली होती. या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला असून यावरून राजकारण देखील रंगले होते. विरोधकांनी या योजनेवरून सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्न करत ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला होता. अशातच २०२६- २७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील ‘लाडकी बहीण योजने’संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, शुक्रवार, ६ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. ही योजना अशीच सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना अशीच सुरु राहणार आहे. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. काळजी करु नका. तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय.” यासोबतच त्यांनी विरोधकांना टोला लगावत म्हटले की, तुम्ही फक्त योजनेविरोधात न्यायालयात जाऊ नका. तसेच राज्यात सध्याच्या घडीला ३७ लाख लखपती दीदी आहेत. आणखी २५ लाख बहिणींना लखपती करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
बळीराजाला दिलासा! पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत २ लाखांपर्यंतची कर्जमाफी
अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार
कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी
श्रीलंकेने इराणच्या ‘IRINS बुशेहर’ला दिला आश्रय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नव्हता. काही महिलांचे तीन महिन्यांचे हफ्ते अडकले होते. मात्र आता सरकारने जानेवारीचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांना एक दोन दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच केवायसी अपडेट न केलेल्या महिलांनी तातडीने केवायसी करून घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच यापुढेही पात्र महिलांसाठी ही योजना सुरु राहणार आहे.







