अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वारी हे गाव आहे. अकोला आणि बुलढाण्याच्या हद्दीवर असलेल्या या गावातून वाण नदी वाहते. इथे एक सुंदर हनुमान मंदीर आहे. वारी हनुमान म्हणून हे मंदीर सुप्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी कोणाला सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता, या गावाच्या नावावरून एक प्रख्यात कंपनी स्थापन होईल आणि सौरऊर्जा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करेल. हितेश दोशी यांचा प्रवास अकोल्यातील याच गावातून सुरू झाला. त्यांनी स्थापन केलेली ‘वारी एनर्जी लिमिटेड’ या कंपनीने अल्पावधीतच बाजारात जम बसवला आहे. सोलार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून वारीची ओळख निर्माण झाली आहे. हितेशभाई या कंपनीचे अध्यक्ष. अनेक चढउतार पाहात हितेशभाई इथेपर्यंत आलेत.

२०१४ पासून मी हितेशभाईंना ओळखतोय. कारण ते माझे सख्खे शेजारी आहेत. एकाच इमारतीत आम्हा दोघांची कार्यालये. अगदी समोरासमोर. त्यांची वाटचाल आणि त्यांच्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे, आणि ते माझ्या. त्यांच्या दोन कंपन्यांच्या लिस्टींगच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. २०० कोटी ते एक लाख कोटीपर्यंत झालेला त्यांच्या समुहाचा प्रवास मी पाहिलेला आहे. पूर्वी अनेकदा आमचे एकमेकांच्या ऑफीसमध्ये चहापान होत असे. सध्या यात खंड पडलाय, कारण अलिकडे आम्ही दोघेही कामात अखंड बुडालेलो असतो. हितेशभाई सुद्धा बऱ्याचदा फिरतीवर असतात.
हितेशभाई दोशी यांनी १९८९ मध्ये एका छोट्या कंपनीतून आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी मी आठवीत होतो. सुरुवातीला त्यांनी ‘वारी इंटरनॅशनल’ या कंपनीची स्थापना केली, जी औद्योगिक उपकरणांच्या व्यवसायात होती. या कंपनीने अनेक देशांतून भारतासाठी उपकरणे आयात करण्याचे काम केले. परंतु, हितेशभाई दोशी यांची दूरदृष्टी केवळ आयात-निर्यातीपुरती मर्यादित नव्हती. त्यांना भविष्यातील गरजा ओळखून एक नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. याच विचारातून त्यांनी सौरऊर्जा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.
हेही वाचा..
आसाममधून ३७ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले!
व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात जे घडलं ते वेगळंच होतं
मानखुर्द: दुर्गा मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांवर मुस्लिम जमावाकडून मारहाण; मूर्तीची तोडफोड!
“युपीत ‘ऑपरेशन कलावा’: लव्ह जिहाद पीडितांना परत आणण्यासाठी ‘नवदुर्गा टास्क फोर्स’”
२००७ मध्ये त्यांनी ‘वारी एनर्जी लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी भारतात सौरऊर्जेबद्दल फारशी जागरूकता नव्हती आणि ही संकल्पना अजूनही बाल्यावस्थेत होती. परंतु, हितेशभाई दोशी यांनी या क्षेत्राची वाढती क्षमता ओळखली. सुरत येथे त्यांनी पहिली सौर पॅनेल उत्पादन फॅक्टरी सुरू केली. या निर्णयामुळे वारी कंपनीने केवळ सौर पॅनेल बनवणारी कंपनी म्हणून नव्हे, तर देशाच्या ऊर्जा क्रांतीतील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
हितेशभाई दोशी यांच्या नेतृत्वाखाली ‘वारी एनर्जी’ने उल्लेखनीय यश संपादन केले आहेत. उत्पादन क्षमतेचा विचार केल्यास ‘वारी एनर्जी’ ही भारतातील सर्वात मोठी सौर पॅनेल उत्पादक कंपनी आहे. त्यांची उत्पादन क्षमता १२ गिगावॅटपेक्षा अधिक आहे. ही क्षमता केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे काम करते आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो रोजगार संधी निर्माण केल्या आहेत आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला मोठे बळ दिले आहे.
वारी कंपनीची उत्पादने आज ९० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात. अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा यात समावेश आहे. हा जागतिक विस्तार हितेशभाई दोशी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी ओळखण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात दर्जाचे महत्व त्यांना व्यवस्थित ठाऊक आहे. त्यांनी कायम दर्जेदार उत्पादने तयार करण्यावर भर दिला.
हितेशभाई दोशी हे जगात नवे काय घडते आहे, याबाबत नेहमीच सजग असतात. नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनावर त्यांचे लक्ष असते. वारी कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सौर पॅनेल (Bi-facial, Mono-PERC) विकसित केले आहेत. यामुळे कंपनीचे उत्पादन नेहमीच आघाडीवर राहिले आहे.
सरकारी आणि खासगी पातळीवर कंपनीने अनेक मोठ्या सौर प्रकल्पांसाठी पॅनेल पुरवले आहेत. यामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी प्रकल्पांचा समावेश आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांनी सौर पार्क विकसित केले आहेत, जे हजारो घरांना वीज पुरवतात. त्यांच्या चार कंपन्या आज शेअर बाजारात लिस्टेड आहेत. ‘वारी एनर्जी’ व्यतिरिक्त, ‘वारी रिन्यूएबल’, ‘इंडो सोलार’ आणि ‘वारी टेक्नोलॉजी’. सगळ्या कंपन्यांचे उत्तम चालले आहे. त्यांच्या दृष्टीने ही तर सुरूवात आहे. भरारी घ्यायला अवघे आकाश बाकी आहे, अशी त्यांची मानसिकता असते. माणूस जेव्हा शून्यातून साम्राज्य निर्माण करतो तेव्हा दोन शक्यता असतात, एक तर तो फळांनी बहरलेल्या झाडा सारखा नम्र असतो किंवा अहंकाराने भरलेला. हितेशभाई पहिल्या प्रकारात मोडतात. एक नक्की की, गेल्या काही वर्षात आमच्यात चांगलाच घरोबा निर्माण झालाय. माझ्यासाठी ते अगदी थोरल्या भावासारखे आहेत. त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठीही फलदायी ठरले आहे. आज माझ्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुमारे ४ हजार कर्मचारी काम करतात. गेल्या १० वर्षात मी उद्योगात जी चार पावले पुढे टाकली आहे, त्यात हितेशभाईंनी दिलेल्या टीप्सचा मोठा वाटा आहे. थॅक्यू हितेशभाई…







