31 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरविशेषएनविडिया सीईओपदासाठी टीम कूकसह तीन भारतीय

एनविडिया सीईओपदासाठी टीम कूकसह तीन भारतीय

जेन्सेन यांच्या राजीनाम्यानंतर जबाबदारी

Google News Follow

जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडिया सध्या नेतृत्वबदलाच्या चर्चेमुळे चर्चेत आली आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेनसन हुआंग यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबत अनेक खुलासे झाल्यानंतर कंपनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे वृत्त आहे. चीनच्या एका कथित गुप्तहेरासोबतच्या संबंधांचाही या आरोपांमध्ये समावेश असून, या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) कोलेट क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, एनव्हिडियाच्या सर्वोच्च पदासाठी तीन भारतीय वंशाच्या उद्योजकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये संजय मेहरोत्रा, निकेश अरोरा आणि थॉमस कुरियन यांचा समावेश आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या तिघांसह अन्य काही दिग्गजांच्या नावांचाही कंपनीच्या नेतृत्वासाठी विचार केला जात आहे. हे तिन्ही उद्योजक अमेरिकेतील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. त्यातील संजय मेहरोत्रा हे मूळचे कानपूरचे, निकेश अरोरा हे मूळचे वाराणसीचे तर थॉमस कुरियन हे मूळचे केरळचे आहेत.

कोलेट क्रेस, इयान बक, रेने हास, लिसा सु, पॅट गेल्सिंगर आणि टिम कुक यांची नावेही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. कंपनीचे संचालक मंडळ अंतर्गत आणि बाहेरील उमेदवारांची क्षमता तपासत असून, एनव्हिडिया नव्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जागतिक विस्ताराच्या केंद्रस्थानी असलेल्या या अब्जावधी डॉलरच्या चिप उत्पादक कंपनीच्या नेतृत्वाची निवड केवळ एनव्हिडियासाठीच नव्हे, तर संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जात आहे. जगभरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या वापरत असलेल्या एआय प्रणालींना आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक चिप्स एनव्हिडिया तयार करते. त्यामुळे कंपनीच्या पुढील नेतृत्वाकडे जागतिक तंत्रज्ञान उद्योगाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

यंदाच्या दिवाळीत काजू कतलीचीच धूम

भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा लवकरच

आठ वर्षांनंतर सँडपेपरचे भूत पुन्हा बाटलीबाहेर!

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे कायम

कोण आहेत हे तीन भारतीय?

कानपूरचे संजय मेहरोत्रा

४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संजय मेहरोत्रा यांचा जन्म कानपूर येथे झाला असून त्यांचे बालपण दिल्लीमध्ये गेले आहे. ते सध्या मेमरी चिप्स तयार करणाऱ्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी या अमेरिकेतील आघाडीच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एनव्हिडिया आणि मायक्रॉन यांच्यात व्यावसायिक सहकार्य असून एनव्हिडिया आपल्या उत्पादनांमध्ये मायक्रॉनच्या चिप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करते. २०१७ पासून मेहरोत्रा मायक्रॉनचे नेतृत्व करत आहेत.

वाराणसीचे निकेश अरोरा

आयआयटी (बीएचयू), वाराणसी येथून शिक्षण घेतलेले निकेश अरोरा हे २०१८ पासून पालो अल्टो नेटवर्क्स या सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाच्या विस्तारावर भर दिला आहे. पालो अल्टो नेटवर्क्समध्ये येण्यापूर्वी त्यांनी गुगलमध्ये जवळपास दहा वर्षे काम केले. त्यानंतर सॉफ्टबँकमध्ये अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

अरोरा यांचा थेट अनुभव चिपनिर्मितीपेक्षा सायबर सुरक्षा आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे व्यवस्थापन यामध्ये अधिक आहे. मात्र, जागतिक स्तरावरील कंपन्यांचे नेतृत्व करण्याचा त्यांचा अनुभव एनव्हिडियासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

केरळचे थॉमस कुरियन

केरळशी कौटुंबिक संबंध असलेले थॉमस कुरियन हे गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलच्या एआय सेवा, एंटरप्राइज सॉफ्टवेअर आणि क्लाउड पायाभूत सुविधांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनव्हिडियाच्या सीईओपदासाठी अ‍ॅपलचे माजी सीईओ टिम कुक यांचे नाव पुढे केले आहे. त्यांनी या पदासाठी कुक यांना पसंती दर्शवताना म्हटले, “आता एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या जागी केवळ एकच व्यक्ती येऊ शकते आणि ती म्हणजे अ‍ॅपलचे टिम कुक. एका दिग्गजाची जागा दुसरा दिग्गज घेईल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा