आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत सीपीआय (माओवादी) संघटनेचे तीन वरिष्ठ नेते ठार करण्यात आले. आंध्र-ओडिशा सीमेवरील देवीपटनमच्या वन क्षेत्रात, विशेष माओवादीविरोधी पथक ‘ग्रेहाउंड्स’ आणि माओवाद्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली. ग्रेहाउंड्सचे जवान जंगलात शोधमोहीम राबवत असताना त्यांनी काही माओवाद्यांना पाहिले आणि आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी गोळीबार केला आणि तीन माओवादी ठार झाले. ही चकमक रामपचोदवरम आणि मारेदुमिल्ली मंडलांमधील कोंडामोडालु जंगल परिसरात झाली.
ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पुढीलप्रमाणे आहे: गजरला रवि ऊर्फ उदय – आंध्र-ओडिशा बॉर्डर (एओबी) स्पेशल झोन कमिटीचे सचिव आणि सीपीआय (माओवादी)च्या केंद्रीय समितीचे सदस्य. अरुणा – स्पेशल झोन कमिटीची सदस्य. अंजू – स्पेशल झोन कमिटीची एरिया कमिटी मेंबर (ACM). घटनास्थळी तिन AK-47 रायफल्स जप्त करण्यात आल्या. अरुणा ही सीपीआय (माओवादी)च्या केंद्रीय समितीचे सदस्य रामचंद्र रेड्डी ऊर्फ चलापथी यांची पत्नी होती. चलापथी यांचा समावेश यंदा जानेवारीत छत्तीसगड-ओडिशा सीमेवर झालेल्या कारवाईत ठार झालेल्या १४ माओवाद्यांमध्ये होता.
हेही वाचा..
‘एक्सिओम-4’ मोहिम पुन्हा लांबणीवर
हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, तर आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू!
ट्रम्प अमेरिकेत असीम मुनीर यांची घेणार भेट, बंद दाराआड करणार जेवण!
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सुनावलं: भारत-पाक युद्धविरामात अमेरिकेचा काहीही सहभाग नाही
अरुणा ही २०१८ मध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यात तेलुगु देसम पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांच्या हत्येत सामील होती. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित होते. उदयवर देखील २५ लाख रुपयांचे इनाम होते. अरुणा ही विशाखापट्टणम जिल्ह्यातील पेंडुर्थी मंडलातील करकावानीपालमची रहिवासी होती.
ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह रामपचोडावरम येथील प्रादेशिक रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चकमकीच्या स्थळाला भेट दिली आहे. ही कारवाई एओबी भागातील माओवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एओबी (आंध्र-ओडिशा बॉर्डर) हा माओवादींसाठी छत्तीसगडच्या दंडकारण्य क्षेत्र आणि झारखंडच्या जंगलांदरम्यान एक सुरक्षित मार्ग मानला जात होता. ही घटना छत्तीसगडमध्ये ‘ऑपरेशन कगार’ अंतर्गत अनेक माओवाद्यांच्या एन्काउंटरनंतर लगेचच घडली असून, माओवाद्यांविरोधातील मोठ्या यशांपैकी एक मानली जात आहे.







