एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’

४ पिल्लांसह वाघिणीचा जंगलात राजेशाही वावर

एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’

दोन वर्षांपूर्वी गिरड–खुर्सापार परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी वाघीण आज त्याच जंगलाची ‘राणी’ म्हणून ओळखली जात आहे. चार गोंडस पिल्लांसह ती गिरडच्या घनदाट जंगलात मुक्तपणे संचार करत असून, तिचा फुललेला संसार हा वनसंवर्धनाच्या यशाची जिवंत साक्ष ठरत आहे.

स्थलांतर करण्यासाठी तीन महिने प्रयत्न

एकेकाळी या वाघिणीच्या आणि तिच्या तीन पिल्लांच्या वारंवार हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. जनावरांवरील हल्ले तसेच मानवी वस्तीजवळील वाढत्या वावरामुळे या वाघ कुटुंबाचे दुसऱ्या जंगलात स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यानंतर वनविभागाने विशेष मोहीम राबवत जवळपास तीन महिने प्रयत्न केले. या काळात दोन पिल्लांना जेरबंद करण्यात यश आले मात्र त्यापूर्वी एका पिल्लाचा अपघाती मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता.

या घडामोडींनंतर वाघिणीला गिरड–खुर्सापारच्या जंगलात अधिक सुरक्षित आणि पोषक अधिवास मिळाला. मुबलक पाणवठे, भक्ष्याची उपलब्धता, शांत वातावरण आणि वनसंवर्धनाच्या उपाययोजनांमुळे तिने पुन्हा चार पिल्लांना जन्म दिला. अवघ्या चार महिन्यांची ही पिल्ले आता आईच्या सान्निध्यात जंगलात बागडत असून, गिरडच्या वनराईत नव्या जीवनाची चाहूल लागली आहे.

गिरडच्या जंगलाची राणी

दरम्यान, आमदार समीर कुणावार आणि वनविभागाच्या पाठपुराव्यामुळे गिरड–खुर्सापार परिसरातील व्याघ्र सफारी प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली आहे. पाणवठ्यांचे संवर्धन, कुरण विकास, वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास, संरक्षण व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरू आहे. या प्रयत्नांमुळे जंगलातील परिसंस्था अधिक सक्षम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गिरड–खुर्सापारचे जंगल आता केवळ वाघांचे अधिवास न राहता विदर्भातील उदयोन्मुख वन्यजीव पर्यटनाचे आकर्षण ठरण्याची क्षमता बाळगत आहे.

हे ही वाचा:

भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात

राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी २० जणांना जिल्हा सोडण्यास बंदी

कीव्हवर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले!

“जम्मू-काश्मीर भारताचाच”; ढाक्यात चुकीच्या नकाशावर भारताचा आक्षेप

हिरवीगार वनराई, समृद्ध जैवविविधता आणि वाघिणीच्या फुललेल्या संसाराची कहाणी निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. भीतीतून विश्वासाकडे आणि संघर्षातून संवर्धनाकडे झालेला हा प्रवास गिरडच्या जंगलासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. एकेकाळी ‘नकोशी’ वाटणारी ही वाघीण आज खऱ्या अर्थाने गिरडच्या जंगलाची राणी बनली आहे.

Exit mobile version