पुणे जिल्ह्यातील बारामती उपविभागातील कटफल गावाजवळ शनिवारी सकाळी ‘रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमी’चे प्रशिक्षण विमान कोसळले. सुदैवाने पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुरक्षित आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते. लँडिंगदरम्यान विमानाचे पुढचे चाक वाकले किंवा तुटल्याने विमान धावपट्टीवरून घसरून गवतामध्ये गेले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित विमान बाजूला नेऊन दुरुस्ती सुरू केली. या दुर्घटनेत विमानाचा पुढील पंखा आणि चाकाजवळील काही भाग नुकसानग्रस्त झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक अहवाल नोंदवण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितले की, “लँडिंगच्या वेळी विमानासमोर काही पक्षी आले. त्यामुळे पायलटने विमान परत वर नेले, पण पुन्हा लँडिंग करताना पुढील चाक खराब झाले.”
रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचा हा पहिला अपघात नाही. ऑक्टोबर 2023 मध्येही या संस्थेच्या प्रशिक्षण विमानाला आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती, तेव्हा प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघेही सुखरूप होते.







