आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यात सोमवारी पहाटे भीषण ट्रेन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटानगर- एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली असून यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
ट्रेनच्या आगीची घटना रात्री १ वाजताच्या सुमारास एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ घडली. लोको पायलटला एका डब्यात आग लागल्याचे दिसले आणि त्याने ताबडतोब ट्रेन थांबवली. बहुतेक प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले, तर नंतर जळालेल्या डब्यातून एक मृतदेह सापडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटानगर- एर्नाकुलम एक्सप्रेसच्या बी- १ कोचमध्ये आग लागली आणि पुढे ही आग बी- २ कोचमध्ये पसरली. खबरदारी म्हणून, आग पुढे पसरण्यापासून रोखण्यासाठी म्हणून बाधित डबे आणि लगतच्या एम- १ कोचला तातडीने उर्वरित ट्रेनपासून वेगळे करण्यात आले. आगीत अडकलेले दोन्ही डबे पूर्णपणे जळून खाक झाले.
हे ही वाचा:
परिवार एकत्र आला म्हणत अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा
भीमाशंकर ज्योतिर्लिंगसह कंगना रनौतने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंगची अद्भुत यात्रा
पाकिस्तानकडून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट
‘ती’ महिला अधिकारी हरवलेली नव्हती!
एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या वेळी एका बाधित डब्यात ८२ आणि दुसऱ्या डब्यात ७६ प्रवासी होते. दुर्दैवाने, बी- १ डब्यात एक मृतदेह आढळला. मृताचे नाव चंद्रशेखर सुंदरम असे आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. सुदैवाने इतर प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आले. ही ट्रेन राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील टाटानगरहून केरळच्या एर्नाकुलमला जात असताना आग लागल्याचे लक्षात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही बोगी वेगळे केल्यानंतर ट्रेन निघाली आणि उर्वरित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.







