काश्मीरचा भूभाग पाकिस्तानने बळकावल्याच्या निषेधार्थ जीनिव्हामध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. जीनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेचे ५४वे सत्र सुरू आहे. या दरम्यान युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी (यूकेपीएनपी)च्या राजकीय कार्यकर्त्यांनी सोमवारी येथे निदर्शने केली. पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्यांनी येथे पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.
‘पाकिस्तानने काश्मीरच्या भूभागावर अतिक्रमण केले आहे. आम्ही याला सन १९४८पासून विरोध करत आहोत. हा पाकिस्तानचा भूभाग नसल्याने आम्ही त्यांना तो भूभाग रिकामा करावा, असे तेव्हापासूनच सांगत आहोत,’ असे युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी मजबूत जाळे तयार केले आहे. तिथे त्यांची मागणे मुक्तपणे फिरत असून लोकांना त्रास देत आहेत. पाकिस्तान आमच्या भौगोलिक संसाधनांचे नुकसान करत आहेत, याकडे जगाचे आणि संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
काश्मिरी नागरिकांचा आत्मसन्मान करण्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचे तसेच, पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या आणि पाकस्तानने बंदी घातलेल्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. येथील नागरिक वाढलेले वीजबिल, महागाई, दहशतवादाविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या निदर्शनांमध्ये पश्तून, सिंधी, बलूच आणि बांगलादेशच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेऊन संयुक्तपणे कट्टरवाद आणि दहशतवादावर टीका केली.
बलूच कार्यकर्त्यांचीही निदर्शने
पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतात पाक लष्कराकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बलूच कार्यकर्त्यांनीही संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी बलूच नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारी छायाचित्रे आणि बॅनर हातात धरले होते. ‘पाकिस्तानी लष्कराकडून दररोज बलूच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. आम्हाला दररोज सोशल मीडियाच्या माध्यमांतून याबाबत माहिती मिळते. पाकिस्तानी लष्कराकडून लोकांचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात, असे बलूच व्हॉइस असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर मेंगल यांनी सांगितले.







